फॅटी लिव्हर आज जगभरात वेगाने वाढणाऱ्या दीर्घकालीन यकृत विकारांपैकी एक ठरत आहे. ही समस्या अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न देता हळूहळू वाढते. जास्त मद्यपान हे एक कारण असले तरी लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल यांसारख्या चयापचयाशी संबंधित समस्या देखील यकृतात चरबी साचण्यास कारणीभूत ठरतात.
मेटाबॉलिक डिस्फंक्शन-असोसिएटेड स्टिअॅटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) — पूर्वीचे नाव नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) — हा सध्या जगातील सर्वात सामान्य यकृत विकार आहे. वेळेवर निदान न झाल्यास ही स्थिती MASH या गंभीर स्वरूपात बदलू शकते, ज्यामुळे यकृत सुजणे, जखमा (स्कॅरिंग) आणि कर्करोगाचाही धोका वाढतो. आश्चर्य म्हणजे, याची काही सुरुवातीची लक्षणे थेट चेहऱ्यावर दिसू शकतात.
डोळ्यांभोवती आणि गालांवर दिसणारी सततची सूज हे यकृताच्या कार्यातील बिघाडाचे संकेत असू शकतात. यकृताचे नुकसान झाल्यास शरीरातील द्रव संतुलन राखणाऱ्या प्रथिनांचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे सूज येते. अॅलर्जी किंवा झोपेअभावी नसताना जर चेहरा सतत फुगलेला वाटत असेल, तर हे लिव्हर कमकुवत होत असल्याचे लक्षण असू शकते.
मानेच्या घडीत दिसणारे काळपट डाग, ज्याला वैद्यकीय भाषेत अॅकँथोसिस निग्रिकन्स म्हणतात, हे इन्सुलिन रेसिस्टन्सशी संबंधित असतात. MASLD मध्ये ही समस्या सामान्य आहे. इन्सुलिनचे प्रमाण वाढल्याने त्वचेच्या रंगद्रव्यात बदल होतो आणि मानेच्या घडीत काळेपणा दिसू लागतो. हा यकृत आणि चयापचयातील बिघाडाचा सुरुवातीचा इशारा असू शकतो.
दीर्घकालीन यकृत विकारांमध्ये चेहऱ्यावर सतत लालसरपणा, त्वचेवर दिसणाऱ्या बारीक रक्तवाहिन्या किंवा रोसेशासारखे पुरळ दिसू शकतात. फक्त रोसेशा म्हणजे लिव्हरचा आजार असे नाही, पण सूज किंवा काळे डाग यांसारख्या इतर लक्षणांसोबत हे बदल दिसल्यास यकृताशी संबंधित समस्या असण्याची शक्यता वाढते. तसेच, यकृत नीट कार्य न केल्यास झिंकसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता होऊन तोंडाभोवती पुरळ किंवा त्वचेची चिडचिड होऊ शकते.
आजार अधिक वाढल्यास त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ), किंवा चेहऱ्यावर खाज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही स्थिती रक्तात बिलिरुबिन आणि पित्तक्षार साचल्यामुळे होते आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज दर्शवते.
फक्त चेहऱ्यावरील लक्षणांवर उपचार करणे पुरेसे नाही; मूळ यकृत विकारावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.
वजन नियंत्रणात ठेवणे
नियमित व्यायाम
प्रक्रिया केलेले व जास्त चरबीयुक्त अन्न टाळणे
रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे
हे उपाय फॅटी लिव्हर टाळण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. सध्या काही नवीन उपचारपद्धतींवर संशोधन सुरू असले तरी, या आजारासाठी अद्याप विशिष्ट औषध उपलब्ध नाही.
हा लेख केवळ सामान्य माहिती देण्यासाठी आहे. यामधील माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. चेहऱ्यावर किंवा शरीरावर कोणतीही संशयास्पद लक्षणे दिसल्यास स्वतः निदान न करता त्वरित पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य तपासणी आणि उपचार हेच आरोग्यासाठी सुरक्षित आहेत.