आजचा दिवस तुम्हाला काही वेगळा गेला असं वाटलं का? साहजिक तुम्ही म्हणाल हे काय आता नवीन, सकाळ झाली, दुपार झाली आता संध्याकाळनंतर रात्र सुरू झाली आहे आणि आता हा प्रश्न का विचारताय. तर अंतराळमध्ये ठीक ५ वाजून ३८ मिनिटांनी अशी एक घटना घडली, ज्या घटनेमुळे पृथ्वीच्या वेळेमध्ये बदल झाला आहे.
त्याचं झालं असं की, आज 23 सप्टेंबर आहे, अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या खगोलशास्त्रीय गणनेनुसार, 23 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी सप्टेंबर इक्विनॉक्सची (Equinox) घटना घडली. या काळात जगाच्या बहुतेक भागांमध्ये दिवस आणि रात्र जवळपास समान वाटेल. म्हणजे 50 टक्के दिवस आणि 50 टक्के रात्र.
पण याचा अर्थ असा आहे का की जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात बरोबर 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असेल का? पण, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर याचं उत्तर काहीतरी वेगळेच निघेल.
इक्विनॉक्स Equinox म्हणजे काय? इक्विनॉक्स हा शब्द लॅटिन भाषेतील Aequus म्हणजे समान आणि Nox म्हणजे रात्र या शब्दांपासून बनलेला आहे. ही सामान्य माहिती आहे की, पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 23.5 अंशांनी झुकलेली आहे. आपल्या कक्षेत सूर्याभोवती फिरताना वर्षातून दोनदा अशी स्थिती येते, जेव्हा पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे जास्त झुकलेला नसतो. जेव्हा सूर्याचे केंद्र थेट पृथ्वीच्या विषुववृत्तावरून जातो, तेव्हा या घटनेला इक्विनॉक्स म्हणतात.
सप्टेंबर महिन्यात सूर्य, उत्तर ते दक्षिण गोलार्धाकडे सरकत विषुववृत्त ओलांडतो. भारतात दिवस आणि रात्र 12-12 तासांची असतील का? गणिताच्या दृष्टीने पाहिले तर इक्विनॉक्सच्या दिवशी दिवस आणि रात्र दोन्ही समान मानले जातात, पण प्रत्यक्षात असे होत नाही. उदाहरणार्थ, 23 सप्टेंबर रोजी राजधानी नवी दिल्लीमध्ये दिवसाचा कालावधी सुमारे 12 तास आणि 7 मिनिटे राहील. म्हणजे अर्ध्यापेक्षा काही मिनिटे जास्त.
असे का होते?
पृथ्वीचे वातावरण सूर्याच्या प्रकाशाला वळवतो. यामुळे सूर्य प्रत्यक्षात क्षितिजावर येण्यापूर्वी काही मिनिटं आधी दिसू लागतो आणि मावळल्यानंतरही काही काळ दिसत राहतो. सूर्य हा एक बिंदू नसून एक मोठं चक्र आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताची गणना सूर्याच्या वरच्या कडा दिसण्यावरून आणि लपण्यावरून केली जाते, त्याच्या केंद्रावरून नाही.
सप्टेंबर इक्विनॉक्ससोबतच उत्तर गोलार्धात खगोलशास्त्रीय शरद ऋतूची सुरुवात होते. याच गोलार्धात भारताचाही समावेश आहे. याच्या अगदी उलट दक्षिण गोलार्धात वसंत ऋतूचे आगमन होतं. 23 सप्टेंबरनंतर सूर्याची थेट किरणे दक्षिण गोलार्धाकडे सरकू लागतील. याचा परिणाम असा होईल की, भारत आणि संपूर्ण उत्तर गोलार्धात हळूहळू दिवस लहान आणि रात्री लांब होऊ लागते.दिवसांच्या लहान होण्याचा हा क्रम 21-22 डिसेंबरपर्यंत सुरू राहील, ज्याला विंटर सोलस्टाइस म्हणतात. हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. मग हळूहळू दिवस मोठा होऊ लागेल.
आता यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, ही घटना खगोलशास्त्रीय दृष्ट्या शरद ऋतूच्या सुरुवातीचे प्रतीक आहे, परंतु भारतात याचा हवामानावर थेट परिणाम जाणवत नाही. कारण, भारताचे हवामान प्रामुख्याने मान्सून आणि स्थानिक हवामान पद्धतींद्वारे नियंत्रित होतं.