मुंबई |
राज्यातील अन्न सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाची कामगिरी केली आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर, दोन शिफ्टमध्ये कामकाज, प्रयोगशाळेतील उपकरणांचा बॅच पद्धतीने वापर आणि नाशवंत तसेच प्रतिबंधित अन्न नमुन्यांना प्राधान्य देण्याच्या उपाययोजनांमुळे अन्न नमुन्यांच्या तपासणीत तब्बल ४६२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित अन्न नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मनुष्यबळाचे नियोजन, दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळा सुरू ठेवणे, नमुन्यांचे वर्गीकरण करून तपासणी करणे तसेच दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत अन्नपदार्थांच्या नमुन्यांना प्राधान्य देण्यात आले.
१ जून २०२६ पर्यंत राज्यातील FDA च्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी १३,४७४ अन्न नमुने उपलब्ध होते. त्यापैकी ७,४९४ नमुन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून तपासणीचे प्रमाण ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तपासणीदरम्यान ४,०९१ नमुने अप्रमाणित आढळले.
याउलट, जून २०२५ मध्ये ९,४०३ नमुन्यांपैकी केवळ १,६२२ नमुन्यांची तपासणी झाली होती. त्यावेळी तपासणीचे प्रमाण फक्त १७ टक्के होते. त्यामुळे यंदाच्या कामगिरीने FDA च्या प्रयोगशाळांची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे FDA च्या तीन शासकीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत. याशिवाय राज्यात आणखी तीन नवीन प्रयोगशाळांचे बांधकाम प्रगतीपथावर असून त्या सुरू झाल्यानंतर अन्न नमुन्यांच्या तपासणीचा वेग आणखी वाढणार आहे. त्यामुळे प्रलंबित नमुने कमी होऊन अन्न सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
अन्न नमुन्यांच्या तपासणीत ४६२% वाढ
१३,४७४ पैकी ७,४९४ नमुन्यांची तपासणी पूर्ण
तपासणीचे प्रमाण १७% वरून ५६% पर्यंत
४,०९१ नमुने अप्रमाणित
राज्यात आणखी ३ नवीन FDA प्रयोगशाळा उभारणीच्या अंतिम टप्प्यात
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, राज्यातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी प्रयोगशाळांची क्षमता वाढविणे, तपासणीचा वेग वाढविणे आणि प्रलंबित नमुने शून्यावर आणणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.