Lionel Messi Creates History : अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. फिफा विश्वचषक २०२६ मध्ये जॉर्डनविरुद्धच्या गट साखळी सामन्यात गोल करत त्याने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
३९ वर्षांच्या मेस्सीने यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची चळत कायम ठेवत संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. मेस्सीला जॉर्डनविरूद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पण अखेरच्या २० मिनिटांत उतरत मेस्सीने हा विक्रमी गोल केला.
अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक २०२६ मधील गट साखळीतील अखेरच्या सामन्यात जॉर्डनचा ३-१ असा पराभव करत विजयी घोडदौड कायम राखली. सुरुवातीला जॉर्डनने कडवी झुंज दिली असली, तरी दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाने आपल्या अनुभव आणि आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. या विजयासह अर्जेंटिनाने गटात अव्वल स्थान कायम राखत बाद फेरीत दमदार प्रवेश केला.
लिओनेल मेस्सीने इतिहास घडवला
या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने केलेल्या गोलमुळे केवळ संघाचा विजयच निश्चित झाला नाही, तर विश्वचषकाच्या इतिहासात सलग सात सामन्यांत गोल करणारा पहिला फुटबॉलपटू होण्याचाही ऐतिहासिक विक्रम त्याने आपल्या नावावर केला. मेस्सीसह अर्जेंटिनाच्या आक्रमक फळीने प्रभावी कामगिरी करत बाद फेरीपूर्वी प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे.
लिओनेल मेस्सी हा फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सलग सात सामन्यांत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. यापूर्वी कोणत्याही फुटबॉलपटूला हा पराक्रम करता आला नव्हता. वयाच्या ३९व्या वर्षातही मेस्सीची गोल करण्याची भूक आणि सातत्य कायम असून, त्याच्या या विक्रमामुळे विश्वचषकातील दिग्गजांच्या यादीत त्याने आणखी एक सुवर्ण पान जोडलं आहे.
जॉर्डनविरूद्ध सामन्यातील गोलसह मेस्सीची विश्वचषकातील गोल्सची संख्या १९ झाली आहे. यंदाच्या विश्वचषकात मेस्सीने पहिल्या सामन्यात ३ गोल्स, दुसऱ्या सामन्यात २ गोल्स आणि तिसऱ्या सामन्यात एक गोल करत त्याने यंदाच्या स्पर्धेत ६ गोल्स केले आहेत.