₹42,000 कोटींहून अधिकच्या रोजगारकेंद्री गुंतवणुकीसह महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा नवा अध्याय!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे 10 सामंजस्य करार संपन्न झाले. यातील 2 करार धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या सामंजस्य करारांच्या माध्यमातून राज्यात तब्बल ₹42,000 कोटींहून अधिक गुंतवणूक होणार असून, 26,000हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र 'डेटा सेंटर कॅपिटल' आणि 'सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल' म्हणून पुढे येत आहे. या गुंतवणुकीतून केवळ नव्या उद्योगसंस्था उभ्या राहणार नाहीत, तर उत्पादन, हरित उर्जा, पोलाद, रिअल इस्टेट, लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती घडणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुंतवणूकदारांनी अतिशय सकारात्मक आणि ठाम बांधिलकी दाखवली आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी शासन गुंतवणूकदारांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देईल. हायपरलूप प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली असून तो वाहतूक व दळणवळण क्षेत्रात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवेल.
यावेळी संपन्न झालेले 2 धोरणात्मक करार :
ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉर (GIBC)सोबत परकीय गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनायटेड किंग्डम, युरोपियन युनियन, यूएसएसमवेत व्यापारी भागीदारी सुलभ करण्यासाठी सामंजस्य करार
टीयूटीआर हायपरलूप प्रायव्हेट लिमिटेडसोबत जेएनपीटी आणि वाढवण बंदरावर अत्याधुनिक हायपरलूप वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार
यावेळी संपन्न झालेले 8 सामंजस्य करार :
सोलर पॅनेल निर्मितीसाठी ज्यूपिटर इंटरनॅशनल लि. या कंपनीसोबत ₹10,900 कोटींचा करार. 8308 रोजगार निर्मिती.
रोचक सिस्टिम्स प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटर या सेक्टरकरिता ₹2508 कोटींचा करार. 1000 रोजगार निर्मिती.
रोव्हिसन टेक हब प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटर या सेक्टरकरिता ₹2564 कोटींचा करार. 1100 रोजगार निर्मिती.
वॉव आयर्न ॲण्ड स्टिल प्रा.लि. कंपनीसोबत पोलाद उद्योगाकरिता ₹4300 कोटींचा करार. 1500 रोजगार निर्मिती.
वेबमिंट डिजिटल प्रा. लि. या कंपनीसोबत डेटा सेंटरकरिता ₹4846 कोटींचा करार. 2050 रोजगार निर्मिती.
औद्योगिक उपकरणे क्षेत्राकरिता ॲटलास कॉपको या कंपनीसोबत ₹575 कोटींचा करार. 3400 रोजगार निर्मिती.
हरित उर्जा क्षेत्रात एलएनके ग्रीन एनर्जी प्रा. लि. या कंपनीसोबत ₹4700 कोटींचा करार. 2500 रोजगार निर्मिती.
डेटा सेंटर, लॉजिस्टिक सेंटर रिअल इस्टेट या क्षेत्राकरिता प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्स लि. या कंपनीसोबत ₹12,500 कोटींचा करार. 8700हून अधिक रोजगार निर्मिती.
यावेळी संबंधित अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.