नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नागपूर येथे मिहान इंडिया लिमिटेडच्या वतीने सीएसआर फंड मधून 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹50,00,000 आणि विविध संस्थांसाठी देणगीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील सेक्टर क्रमांक 34, 35 व 36 मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्या.
सुपूर्द करण्यात आलेले धनादेश :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपूर डेंगी समिती : ₹45,43,936
वुमेन्स एज्युकेशन सोसायटी : ₹24,93,000
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय : ₹30,00,000
कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ॲण्ड फॅमिली वेलफेयर सोसायटी : ₹25,00,000
यावेळी जिल्हाधिकारी, नागपूर यांनी चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील नागरी सुविधा मनपाला हस्तांतरण करण्याबाबत संक्षिप्त माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना हस्तांतरण प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
चिंचभुवन गावठाणातील नागरी सुविधांबाबत
याप्रसंगी मौजा जायताळा, भामटी, चिंचभुवन आणि शिवणगाव या शहरी भागातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या पूर्वेस, चिंचभुवन येथे 58.21 हेक्टर क्षेत्रामध्ये आराखडा तयार करून सुमारे 1506 भूखंडांची आखणी करण्यात आली आहे. शिवणगाव येथील एकूण 1161 प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्यात आले असून, त्यापैकी 1075 प्रकल्पग्रस्तांना प्रत्यक्ष ताबा देण्यात आला आहे. यापैकी सुमारे 400 ते 415 प्रकल्पग्रस्तांनी नवीन पर्यायी गावठाणात वास्तव्यास सुरुवात केली आहे. तसेच सुमारे 600 घरे बांधकामाच्या प्रक्रियेत आहेत. नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी एकूण ₹65.80 कोटी खर्च करण्यात आले असून, आज या सुविधा नागपूर महानगरपालिकेकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आल्या.
यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.