मविप्रच्या नोकरी मेळाव्यात एकाच दिवसात ३८० उमेदवारांना रोजगार

मविप्रच्या नोकरी मेळाव्यात एकाच दिवसात ३८० उमेदवारांना रोजगार
  • Positive News
  • जून 20 2026

Share on  

मविप्रच्या नोकरी मेळाव्यात एकाच दिवसात ३८० उमेदवारांना रोजगार
------------------------------
स्थानिक युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी : ॲड. नितीन ठाकरे
------------------------------
नाशिक : मविप्रचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल आणि सीआयआय मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत करिअर समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण आणि प्लेसमेंटविषयक मार्गदर्शन देऊन त्यांना नाशिकसह राज्यातील विविध नामांकित उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे, नाशिकमध्ये रोजगाराच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल आणि सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आयोजित भव्य नोकरी मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ३८० विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रेही प्रदान करण्यात आली. 
प्रारंभी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्यास मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, सर्व संचालक मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, प्राचार्य प्रा. प्रशांत पाटील, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या सुमारे ५६० नोकरी इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यात ८४ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवत तांत्रिक तसेच बिगर तांत्रिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या. दिवसभर चाललेल्या निवड प्रक्रियेनंतर एकूण ३८० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित कंपन्यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे (Offer Letters) प्रदान करण्यात आली.
या रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रा. प्रशांत पाटील, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी (टीपीओ) प्रा. एस. एस. आहेर, सीआयआय मॉडेल करिअर सेंटरचे मॅनेजर सागर शिरसाठ, जॉब फेअर समन्वयक एचआर कमलेश गोसावी, एचआर सतीश पवार, एचआर अनिकेत निकुंभ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------------------------
 कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या उपक्रमाला प्रतिसाद 
मविप्रच्या कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या वतीने आतापर्यंत १० रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थी आणि युवकांना उद्योग क्षेत्राशी जोडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यांना उद्योग क्षेत्रासह उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांनी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन गुणवत्तेच्या आधारे निवड केली आहे. विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग, उत्तम पद आणि उत्तम पगार ही या मेळाव्याची वैशिष्टये राहिली आहेत. शिक्षण घेत असतानाच हजारो विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याचा मविप्र संस्थेचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील अभिनंदनीय उपक्रम ठरत आहे.  
-----------------------------------

संबंधित बातम्या