जागतिक आदिवासी दिन!!पालघरमध्ये निघणार  'एक जिल्हा - एक रॅली'; भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेकडून प्रकल्पांच्या विरोधात आणि हक्कांसाठी लढा तीव्र!

जागतिक आदिवासी दिन!!पालघरमध्ये निघणार  'एक जिल्हा - एक रॅली'; भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेकडून प्रकल्पांच्या विरोधात आणि हक्कांसाठी लढा तीव्र!
  • Positive News
  • ऑगस्ट 9 2026

Share on  

जागतिक आदिवासी दिन!!पालघरमध्ये निघणार  'एक जिल्हा - एक रॅली'; भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेकडून प्रकल्पांच्या विरोधात आणि हक्कांसाठी लढा तीव्र!


मुंबई : संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात ‘एक जिल्हा – एक रॅली’ चे आयोजन भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. 

यंदा हा दिन “आदिवासी पारंपरिक सुईणींचा सन्मान: जीवन आणि आरोग्याचे संरक्षण” या संकल्पनेवर साजरा केला जात असून, याद्वारे आदिवासींच्या हक्कांसह जिल्ह्यावरील विनाशाचे संकट टळण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे.

सध्या पालघर जिल्ह्यातील जल, जंगल, जमीन, पर्यावरण आणि आदिवासींच्या अस्तित्वावर गंभीर संकट उभे ठाकले आहे. वाढवण बंदर, चौथी मुंबई, ग्रीनफिल्ड महामार्ग, मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे, फ्रेट कॉरिडॉर, रिफायनरी, विमानतळ, सागरी महामार्ग, गारगाई धरण आणि विविध औद्योगिक व लॉजिस्टिक पार्कसारख्या अनेक प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील आदिवासींसह सर्वसामान्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर हा लढा केवळ एका समाजाचा नसून संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या पर्यावरणीय आणि भविष्यकालीन सुरक्षेसाठीची एक मोठी लोकचळवळ बनली असल्याचे कडून जाहीर करण्यात आले आहे.

यंदाच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त दोन्ही संघटनांनी एकत्र येत ‘एक जिल्हा – एक रॅली’ची हाक दिली असून, रॅलीचे प्रस्थान दोन वेगवेगळ्या मार्गांनी होणार आहे. यामध्ये आदिवासी एकता परिषद रॅली दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक दरम्यान काढणार आहे तर पालघर भूमिसेने कडून दुपारी १२ वाजता बिरसामुंडा चौक (बोईसर रोड), छत्रपती शिवाजी महाराज चौक, पालघर स्टेशन, हुतात्मा चौक ते थेट पालघर तहसील कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर आणि भूमिपुत्र आपापल्या पारंपारिक नाच-गाण्यांसह आणि सांस्कृतिक एकजुटीचे दर्शन घडवत मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होणार आहे.

रॅली दरम्यान शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी

आदिवासी एकता परिषद, भूमी सेना आणि जय आदिवासी युवा शक्ती यांच्या वतीने काढल्या जाणाऱ्या या तीन मोठ्या रॅलींमध्ये १५ हजारांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पालघरचे अपर जिल्हादंडाधिकारी सुभाष भागडे यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. उद्या सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पालघर शहरात सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात जड वाहनांसाठी मनोर, बोईसर व सफाळा मार्गांवर पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, ही बंदी अत्यावश्यक सेवा, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रवासी बसेस आणि रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. नागरिकांनी प्रशासनाच्या या वाहतूक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रॅलीदरम्यान प्रमुख मागण्या

* वाढवण बंदर, सागरी महामार्ग, गॅस पाइपलाईन, औद्योगिक टाऊनशिप आणि गारगाई धरणासह सर्व विनाशकारी प्रकल्प तातडीने रद्द करावेत.
* पेसा कायदा, वनहक्क कायदा व संविधानाचे काटेकोर पालन करून जंगलावरील आदिवासींचे पारंपरिक अधिकार अबाधित ठेवावेत.
* आदिवासी आश्रमशाळांमधील गैरप्रकार व शोषणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करावी.
* पालघर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आधुनिक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात.
* पिढ्यानपिढ्या वाहिवाटीत असलेल्या घर व जमिनी आदिवासींच्या नावावर करण्यासाठीच्या अटी-शर्ती शिथिल कराव्यात.
* २२ जुलै २०२६ च्या जात प्रमाणपत्र पडताळणी सुधारणा कायद्यातील जाचक अटी शिथिल कराव्यात व जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी.

संबंधित बातम्या