व्हॉयेजर... अजूनही बोलत आहे!

व्हॉयेजर... अजूनही बोलत आहे!
  • Positive News
  • ऑगस्ट 6 2026

Share on  

व्हॉयेजर... अजूनही बोलत आहे!

कल्पना करा...
तुमच्या जन्मापूर्वी अवकाशात पाठवलेले एक यान आजही पृथ्वीशी संवाद साधत आहे... आणि तेही आपल्या सूर्यमालेच्या पलीकडून!

हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही विज्ञानकथा नाही... हे वास्तव आहे.

५ सप्टेंबर १९७७ रोजी अमेरिकेच्या नासाने व्हॉयेजर-१ हे यान अवकाशात पाठवले. उद्देश साधा होता—गुरू (Jupiter) आणि शनी (Saturn) या ग्रहांचा जवळून अभ्यास करायचा, त्यांची छायाचित्रे घ्यायची आणि काही मोजमाप करून मोहीम संपवायची.

पण विज्ञानात अनेकदा नियोजनापेक्षा इतिहास मोठा ठरतो...

गुरू आणि शनीच्या गुरुत्वाकर्षणाचा हुशारीने उपयोग करून व्हॉयेजर-१ आणखी वेगाने पुढे निघाले. मोहिम संपली नाही... उलट ती मानवजातीच्या सर्वात मोठ्या वैज्ञानिक प्रवासात बदलली.

पण पुढे असे काय घडले, ज्यामुळे हे यान इतिहासात अजरामर झाले?

२०१२ मध्ये व्हॉयेजर-१ ने एक अभूतपूर्व पराक्रम केला. ते आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील सीमारेषेपलीकडे गेले. ही सीमारेषा म्हणजे हेलिओपॉज (Heliopause). सोप्या भाषेत सांगायचे तर, सूर्यापासून सतत बाहेर फेकल्या जाणाऱ्या विद्युतभारित कणांचा एक विशाल फुगा आपल्या संपूर्ण सूर्यमालेला वेढून असतो. त्या फुग्याची शेवटची सीमा म्हणजे हेलिओपॉज.

या सीमारेषेपलीकडे म्हणजे तारकांमधील अवकाशाची खरी सुरुवात.

मानवाने बनवलेली आणि त्या प्रदेशात पोहोचलेली ही पहिलीच वस्तू!

तेव्हापासून व्हॉयेजर-१ आपल्याला अशा प्रदेशातील माहिती पाठवत आहे, जिथे आजपर्यंत कोणतेही दुर्बीण किंवा यान प्रत्यक्ष पोहोचले नव्हते.

या यानाने आतापर्यंत काय दिले?

गुरूच्या ढगांचे आणि त्याच्या उपग्रहांचे पहिले जवळचे फोटो...
शनीच्या कड्यांचे अभूतपूर्व निरीक्षण...
सूर्यमालेची खरी सीमा कुठे आहे याचा पुरावा...
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—तारकांमधील अवकाश हा आपण समजत होतो तितका शांत आणि रिकामा नाही, हे दाखवणारी प्रत्यक्ष मोजमापे.

पण नुकतीच मिळालेली माहिती तर वैज्ञानिकांनाही चक्रावून सोडणारी आहे.

व्हॉयेजर-१ च्या उपकरणांनी तारकांमधील प्लाझ्मा (विद्युतभारित कणांचा अतितप्त वायू) सतत कंप पावत असल्याचे नोंदवले. वैज्ञानिकांना वाटत होते की हा प्रदेश अत्यंत शांत, थंड आणि जवळजवळ रिकामा असेल.

पण प्रत्यक्षात तिथे सतत हालचाल आहे.

याहूनही आश्चर्य म्हणजे हेलिओपॉजच्या परिसरात सुमारे ३०,००० अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. हे सूर्याच्या दृश्यमान पृष्ठभागापेक्षाही जास्त आहे. तरीही हा अतितप्त प्लाझ्मा विखुरत नाही, तर एका सुव्यवस्थित थराप्रमाणे टिकून आहे. हे नेमके कसे शक्य आहे, याचे उत्तर अजूनही वैज्ञानिकांकडे नाही.

आणखी एक धक्का म्हणजे, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र आणि आकाशगंगेचे चुंबकीय क्षेत्र पूर्णपणे वेगळे नसून त्या सीमारेषेवर परस्परांशी जोडले जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. म्हणजे आपली सूर्यमाला आपण समजत होतो तितकी स्वतंत्र नाही.

हे सर्व समजून घेण्यासाठी अजूनही संशोधन सुरू आहे.

इतक्या वर्षांनंतरही हे यान चालते कसे?

२०२३ मध्ये व्हॉयेजर-१ पृथ्वीवर सिग्नल पाठवत होते, पण त्या सिग्नलमधील वैज्ञानिक माहिती पूर्णपणे निरर्थक (gibberish) होती. म्हणजे यान जिवंत होते, परंतु त्याचा "अर्थपूर्ण संवाद" बंद झाला होता.

NASA च्या अभियंत्यांनी अनेक महिने तपास केला. अखेर त्यांना आढळले की यानाच्या Flight Data System (FDS) मधील एका मेमरी चिपचा काही भाग जवळपास ४६ वर्षांच्या अंतराळातील किरणोत्सर्गामुळे खराब झाला होता. त्यामुळे वैज्ञानिक माहिती योग्य स्वरूपात तयार होत नव्हती.

यानंतर त्यांनी एक विलक्षण पराक्रम केला.

यान पृथ्वीपासून सुमारे २४ अब्ज किलोमीटर दूर होते.
एका संदेशाला पोहोचायला सुमारे २२ तास लागत होते.
चुकीची एकच कमांड संपूर्ण मोहीम कायमची संपवू शकली असती.

म्हणून अभियंत्यांनी खराब झालेला प्रोग्राम दुसऱ्या मेमरी भागात "हलवला", त्याचे छोटे-छोटे तुकडे केले आणि नव्या पद्धतीने सॉफ्टवेअर पुन्हा लिहिले.

याला अनेकांनी "Remote Brain Surgery" (दूरून केलेली मेंदूची शस्त्रक्रिया) असे म्हटले.

एप्रिल २०२४ मध्ये व्हॉयेजर-१ ने पुन्हा समजण्याजोगा डेटा पाठवायला सुरुवात केली आणि काही महिन्यांत त्याची सर्व चार उर्वरित वैज्ञानिक उपकरणे पुन्हा कार्यरत करण्यात आली

एका संदेशाला पृथ्वीवर यायला जवळजवळ २४ तास लागतात... आणि उत्तर पोहोचायला आणखी २४ तास!

आज व्हॉयेजर-१ जवळजवळ अर्धशतक जुने आहे. तरीही ते मानवजातीसाठी विश्वाच्या अज्ञात प्रदेशातून माहिती पाठवत आहे. त्याच्याकडे 'गोल्डन रेकॉर्ड' नावाची सोन्याने मढवलेली डिस्कही आहे. त्यात जगातील ५५ भाषांतील शुभेच्छा, पृथ्वीवरील निसर्गाचे आवाज, मानवी हास्य, विविध संस्कृतींचे संगीत आणि मानवजातीची ओळख जतन करण्यात आली आहे. भारतातून त्यामध्ये फक्त हिंदी भाषेतील एक संदेश आहे—"नमस्ते। हमारे शुभकामनाएँ स्वीकार करें।" म्हणजेच, "नमस्कार. आमच्या शुभेच्छा स्वीकारा." कधीतरी विश्वात एखाद्या बुद्धिमान संस्कृतीला ही डिस्क सापडली, तर पृथ्वीवरील मानवजातीची ही पहिली ओळख ठरेल.

कधी कधी वाटते... विज्ञानातील सर्वात मोठे शोध अत्याधुनिक यंत्रांमुळे होत नाहीत, तर जवळपास पन्नास वर्षांपूर्वी बनवलेल्या एका जिद्दी यानामुळेही होऊ शकतात!

तुमच्या मते, व्हॉयेजर-१ ला अजूनही विश्वात अशी कोणती गोष्ट सापडू शकते, जी आपल्या विश्वाविषयीची समज पूर्णपणे बदलून टाकेल?

संबंधित बातम्या