५१ व्या ग्रंथभेट योजनेअंतर्गत १,१८३ ग्रंथांची यादी जाहीर; ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन

५१ व्या ग्रंथभेट योजनेअंतर्गत १,१८३ ग्रंथांची यादी जाहीर; ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन
  • Positive News
  • ऑक्टोबर 26 2026

Share on  

५१ व्या ग्रंथभेट योजनेअंतर्गत १,१८३ ग्रंथांची यादी जाहीर; ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन

    ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजना आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या ५१ व्या ग्रंथभेट योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या १,१८३ ग्रंथांची सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीसंदर्भात काही सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदवावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

सन २०२४ मध्ये प्रकाशित होऊन संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी ही निवड केली आहे. यामध्ये विविध भाषांतील ग्रंथांचा समावेश असून मराठीतील ६८५, हिंदीतील २४६ आणि इंग्रजीतील २५२ अशा एकूण १,१८३ ग्रंथांची निवड झाली आहे.
ही सविस्तर ग्रंथयादी संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वाचकांसाठी व संबंधितांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत काही आक्षेप, सूचना किंवा ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही दुरुस्ती अथवा बदल असल्यास ते लेखी स्वरूपात 'ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – ४००००१' या पत्त्यावर ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले ग्रंथ संचालनालयाच्या २५ टक्के ग्रंथसूटदरानुसार वितरित करणे बंधनकारक राहील, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या