संस्कृतीचा वारसा जपणारी संतसृष्टी: पिंपरी-चिंचवडला लाभले भक्तिचे नवे दालन!
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वडमुखवाडी, पुणे येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्मित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीच्या समूहशिल्प व संतसृष्टीचे उदघाटन संपन्न झाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “संतसृष्टी व ऐतिहासिक भेटीच्या समूहशिल्पाच्या उदघाटनाच्या माध्यमातून एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले,” अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. एकूण ₹30 कोटी 69 लाखांच्या निधीतून थोरल्या पादुका, वडमुखवाडी, चऱ्होली (पुणे) येथे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीतील वारकरी संप्रदाय व महान संतांची माहिती मिळावी या उद्देशाने संतसृष्टी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे स्मरणरूप या ठिकाणी साकारण्यात आले आहे.
या ठिकाणी मिश्र धातूपासून तयार केलेली 25 शिल्पे आहेत, ज्यामध्ये संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आणि इतर 20 वारकरी समाविष्ट आहेत. या शिल्पांसोबतच चौथरा, रिटेनिंग वॉल, स्टोन क्लॅडिंग, ओपन एअर थिएटर, विद्युत आणि बागकाम, रेलिंग व स्वच्छतागृह यांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. या परिसरात संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित 47 ब्रॉन्झ म्युरल्स उभारण्यात आले असून, त्यांच्या शेजारी माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत.
यावेळी खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, आ. अमित गोरखे, आ. उमा खापरे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.