नाशिकमध्ये दोन दिवस रंगणार सह्याद्री मित्र संमेलन : ॲड. नितीन ठाकरे

नाशिकमध्ये दोन दिवस रंगणार सह्याद्री मित्र संमेलन : ॲड. नितीन ठाकरे
  • Positive News
  • जून 14 2025

Share on  

 

नाशिकमध्ये दोन दिवस रंगणार सह्याद्री मित्र संमेलन : ॲड. नितीन ठाकरे

यंदाचा सह्याद्री रत्न पुरस्कार ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना जाहीर

नाशिक : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेल्या पर्यावरणप्रेमी आणि गिरीभ्रमणप्रेमींच्या सह्य मित्र फाउंडेशनच्या वतीने नाशिकमध्ये शनिवार दि. ५ आणि रविवार दि. ६ जुलै असे दोन दिवस कै. अविनाश जोशी स्मृतीप्रीत्यर्थ सह्याद्री मित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली. तसेच, त्यांनी यंदाच्या ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नावाचीही घोषणा केली.
मविप्रच्या गंगापूर रोडवरील मध्यवर्ती कार्यालयात शुकवार दि. १३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अभिजित अकोलकर, दिलीप गिते, संदीप काकड, रत्नाकर भामरे, केशव उगले, सागर जोशी, नंदकुमार देसाई, गिता पाटील, किरण वाघचौरे, गौरव शिरोडे, संतोष चव्हाण, डॉ. सुधीर संकलेचा, निलेश पवार, ओमप्रकाश रावत, प्रा. आनंद बोरा, श्रीकांत कासट, ज्योती उगले, श्रीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या वार्‍यात इतिहासाचे सूर आहेत, डोंगराच्या शिखरांवर स्वप्ने उभी राहतात आणि पायवाटांवर एक जिवंत परंपरा जपलेली असते. याच परंपरेला साजेसे असे ‘सह्याद्री मित्र संमेलन–नाशिक’ यंदा तिसऱ्या वर्षात दिमाखात संपन्न होत आहे. हे संमेलन कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालय परिसरातील गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांच्या सहभागातून तीन प्रेरणादायी उपक्रम राबविले जाणार आहेत, जे नुसते कार्यक्रम नसून निसर्गप्रेम, सामाजिक भान आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे जिवंत प्रतीक ठरणार आहेत.
सह्याद्रीसाठी जगणाऱ्या प्रत्येकाला या उपक्रमांत सहभागी होण्याचे आमंत्रण आहे. हे उपक्रम म्हणजे आपल्या डोंगररांगांशी, पर्यावरणाशी आणि शहराच्या आरोग्याशी असलेले आपले जिवंत नाते जपण्याची संधी आहे, असेही यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

ब्रह्मगिरी स्वच्छता मोहिम
ज्याच्या अंगाखांद्यावर गोदावरी उगमते, ज्याच्या दऱ्याखोर्‍यात अध्यात्म आणि साहस एकत्र नांदतात. मात्र अशा या पवित्र ब्रह्मगिरी डोंगररांगांवर हल्ली वाढत्या मानवी वावरामुळे प्लास्टिक व इतर कचऱ्याचे अतिक्रमण वाढते आहे. त्यामुळे या पर्वताच्या पावित्र्याच्या रक्षणासाठी, सह्य मित्र फाउंडेशन आणि संमेलन आयोजन समितीतर्फे रविवार दि.१५ जून रोजी विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे केवळ कचरा उचलण्याचे नव्हे, तर निसर्गाशी नाते घट्ट करणारे आंदोलन आहे. नोंदणी करणाऱ्यांसाठी प्रवासाची व्यवस्था केली जाणार आहे. या उपक्रमाचे नियोजन दिलीप गीते आणि भास्कर मेढे यांच्याकडे आहे.

विश्रामगड (पट्टा किल्ला) ट्रेक
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः जिथे विश्रांती घेतली, असा ऐतिहासिक आणि निसर्गमय किल्ला म्हणजे विश्रामगड..! या गडावरच्या मोहीमेचा अनुभव म्हणजे इतिहास, रोमांच आणि निसर्गप्रेमाचं एकत्रित दर्शन. रविवार दि. २२ जून रोजी या गडावर ट्रेक आयोजित केला आहे. या ट्रेकमध्ये सहभागी होऊन सह्याद्रीच्या गडकोटांशी आपलं नातं अजून घट्ट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी रत्नाकर भामरे आणि संदीप काकड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


हेल्दी, ग्रीन नाशिकसाठी सायकल रॅली
नाशिक हे 'सायकल सिटी' म्हणून ओळखले जावे, यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती सातत्याने प्रयत्नशील आहेत. या दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी संमेलन आयोजन समितीने रविवार दि. २९ जून रोजी ‘हेल्दी नाशिक, ग्रीन नाशिक’ सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. सायकल चालविताना आपण केवळ स्वतःचे आरोग्य सुधारत नाही, तर निसर्गालाही मदत करत असतो. ही रॅली आरोग्य, पर्यावरण आणि जागरूकतेचा अनोखा संगम ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे : हिमालयीन मोहिमांचे आयोजक
महाराष्ट्रातील आघाडीचे गिर्यारोहक आणि हिमालयीन मोहिमांचे आयोजक ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना नुकताच भारत सरकारचा "तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार – २०२३" प्रदान करण्यात आला. "गिरिप्रेमी" संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गिर्यारोहण संस्कृतीला नवा आयाम दिला आहे, अशा महनीय व्यक्तिस यंदाचा सह्याद्री रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

उमेश झिरपे यांचा  अर्ध्या कॉलमचा फोटो
नाशिक : मविप्रच्या गंगापूर रोडवरील मध्यवर्ती कार्यालयात शुकवार दि. १३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सह्याद्री मित्र संमेलनासंदर्भात माहिती देताना संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितिन ठाकरे. समवेत संमेलन आयोजन समितीचे सदस्य.

संबंधित बातम्या