कार्यकर्त्यापासून केंद्रीय मंत्रीपर्यंतचा प्रवास - लातूरमध्ये लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण

कार्यकर्त्यापासून केंद्रीय मंत्रीपर्यंतचा प्रवास - लातूरमध्ये लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण
  • Positive News
  • ऑगस्ट 12 2025

Share on  

कार्यकर्त्यापासून केंद्रीय मंत्रीपर्यंतचा प्रवास - लातूरमध्ये लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लातूर येथे ‘लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि कोनशिलेचे अनावरण’ संपन्न झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा, नेतृत्वगुणांचा आणि महाराष्ट्रातील योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे हे सामान्य कार्यकर्त्यापासून देशातील उच्च पदांपर्यंत पोहोचले होते. त्यांनी पक्ष संघटन उभारून महाराष्ट्रात भाजपाचा पाया रचला. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी शासनाला जबाबदार धरण्याचे कार्य प्रखरपणे केले आणि राजकारणातील गुन्हेगारीकरणाविरोधात ठाम भूमिका घेतली. गृहमंत्री म्हणून ‘मकोका’ सारखा कठोर कायदा प्रस्तावित करून राज्याला अंडरवर्ल्डच्या विळख्यातून मुक्त करण्याचे कार्य केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सत्ता नसतानाही गोपीनाथराव मुंडे यांचा प्रभाव मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नव्हता. ते म्हणायचे, विरोधी पक्षात असताना सत्तेशी कधीच तडजोड करू नये. सामाजिक न्यायासाठी त्यांची लढाई अखंड सुरू राहिली. मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार, दलित-आदिवासी-भटके विमुक्त यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष आणि महाराष्ट्रातील विविध समाजांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना फार कमी कालावधी मिळाला. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या राहुन गेलेल्या अनेक स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम राज्य सरकार करत आहे, त्यात प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळमुक्ती आणि अहिल्यानगर-परळी-बीड रेल्वे प्रकल्प असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, लातूरची ₹291 कोटींची पाणीपुरवठा योजना आणि लातूरचे सामान्य रुग्णालय यांना तात्काळ मान्यता दिली जात आहे. तसेच, लातूरमधील कोच फॅक्टरीमध्ये येत्या काळात 10,000 रोजगार निर्माण होणार असून त्यात स्थानिकांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाईल.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या