मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व
आहारतज्ञ क्षितीजा राहुल गायकवाड
एम. एस.सी. ( फूड सायन्स अँड न्युट्रिशन)
मुलांना शाळेच्या डब्यामध्ये पौष्टिक अन्न देणे खूप महत्वाचे आहे कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहे. पौष्टिक आहारामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यांचे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते, आणि त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवते.
पौष्टिक आहाराचे महत्वाचे घटक:
- फळे: बेरी, सफरचंद, केळी यांसारखी ताजी फळे व्हिटॅमिन्स आणि फायबरने समृद्ध असतात.
* सुकामेवाः वाळलेले फळ आणि नट्स हे ऊर्जेचा चांगला स्रोत आहेत.
* भाज्याः मेथी,पालक,शेंगा, कोबी , फ्लॉवर ब्रोकोली, गाजर, यांसारख्या सर्व भाज्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असतात.
* प्रथिनेः डाळी, उसळी,सोयाबीन,दही, अंडी, चिकन यांसारखे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.
* संपूर्ण धान्यः ब्राउन राइस, क्विनोआ, ओट्स
यांसारखे संपूर्ण धान्य फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात.
पौष्टिक डब्बा तयार करण्याच्या टिप्सः
डब्ब्यामध्ये विविध प्रकारचे अन्न समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.
प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवा.
ताजे आणि हंगामी पदार्थांचा वापर करा.
मुलांना आवडतील अशा पद्धतीने अन्न तयार करा.
५ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी रोज ग्लासभर दूध, भात, भाजी, भाकरी किंवा पोळी, डाळ, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, सुखामेवा, दुधाचे पदार्थ, यांचा समावेश करावा. '
उदाहरणार्थ
* मिक्स कडधान्यांच्या भाजणीचे थालीपीठ + शेंगदाणे, तीळ किंवा खोबऱ्याची चटणी किंवा कोथिंबीर पुदिन्याची चटणी,दही, ( टोमॅटो सॉस देणे टाळावे.)
* मिक्स भाज्यांचा रव्याचा किंवा शेवयांचा उपमा+ फुटाणे+ हंगामी फळे
* मिश्र डाळींचे अप्पे किंवा धिरडे+ हिरवी चटणी+ सुकामेवा
* भाज्या टाकून बनवलेला डोसा किंवा उत्तप्पा+ बटाट्याची भाजी+हिरवी चटणी
* मसाला ओट्स इडली +सांबर,,+बदामाचा शिरा
* पालेभाज्या+ पनीर +बटाटा पराठा+ दही +राजगिरा लाडू/ चिक्की
* विविध भाज्या व सोयाबीन टाकून बनवलेला पुलाव+ चिक्की+फळे
* भाज्या+ पनीर+ चीज रोल + लाडू+ फळ
* मुलांच्या आवडीच्या भाज्या टाकून बनवलेले कटलेट्स + हिरवी चटणी+ सुका मेवा
* मोड आलेले कडधान्याची भेळ +मखाने+ फळे इत्यादी
टीप.
* (टोमॅटो सॉस ऐवजी विविध चटण्या देऊ शकता. जॅम च्या ऐवजी साखरआंबा, गुळांबा, मेथांबा सारखे पदार्थ देऊ शकता, चिप्सच्या ऐवजी घरी बनवलेला चिवडा खाकरा, रताळ्याचे, बटाट्याचे काप इत्यादी देऊ शकता. बिस्किट किंवा कुकीज च्या जागी लाडू किंवा चिक्की देऊ शकता.)
* ज्या भाज्या मुलं खात नाही त्यांना पराठे, थालीपीठ, रोल, कटलेट्स मध्ये बारीक करून देऊ शकता.