नागपूर : इंदोरा चौक-दिघोरी चौक उड्डाणपुलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्यात येणार आहे.
आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त नामकरण
शहरातील उत्तर-दक्षिण वाहतुकीला जोडणाऱ्या इंदोरा चौक-दिघोरी चौक उड्डाणपुलाचे शनिवारी लोकार्पण होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त या उड्डाणपुलाला संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.मात्र, उड्डाणपुलाच्या नामकरणाचा निर्णय जाहीर होताच काँग्रेसने त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. शहरातील सार्वजनिक पायाभूत सुविधेला राजकीय-सामाजिक संस्थेच्या संस्थापकाचे नाव देण्याची गरज काय, असा मुद्दा काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.
८.९ किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा दिघोरी उड्डाणपूल पूर्ण झाला आहे. इंदोरा चौक ते दिघोरी चौक या मार्गावर सुमारे ८.९ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पूर्व नागपुरातील प्रमुख चौकांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.पहिल्या टप्प्यात भांडे प्लॉट ते दिघोरी हा भाग पूर्ण करण्याचे नियोजन होते. एप्रिल २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असतानाही प्रकल्पाला विलंब झाला. अखेर काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी लोकार्पण करण्यात येणार आहे.
दाट वस्तीतून बांधकाम; वाहतूक कोंडीचा प्रश्न
जुन्या आणि दाट लोकवस्तीच्या भागातून उड्डाणपूल उभारण्यात आल्याने बांधकामादरम्यान अनेक अडचणी आल्या. अरुंद रस्ते, इमारतींच्या जवळ खांब उभारणे तसेच बांधकाम साहित्य आणि अवजड यंत्रसामग्रीच्या वाहतुकीमुळे स्थानिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.प्रकल्पातील सुमारे तीन किलोमीटर भाग यूएचपीएफआरसी गर्डर्सवर उभारण्यात आला असून ९० मीटरचे दोन, ६० मीटरचे ३६ आणि ४० ते ४५ मीटरचे अनेक स्पॅन आहेत. पुलाची रुंदी सुमारे १२ मीटर आहे. दिघोरी उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पूर्व नागपुरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, लोकार्पणाच्या आधीच हेडगेवार यांच्या नामकरणावरून सुरू झालेला राजकीय वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
काँग्रेसची टीका:नामकरणामागे नेमका उद्देश काय?'
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी या निर्णयावर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रनिर्माणात योगदान नसल्याचा दावा करत संघाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सामाजिक तेढ निर्माण करण्यास संघाचा वाटा असल्याचा आरोपही त्यांनी केला.संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे संस्थापक हेडगेवार यांचे नाव उड्डाणपुलाला देण्यात येत असल्याने या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप गुडधे यांनी केला. त्यामुळे उड्डाणपुलाच्या लोकार्पणापेक्षा त्याच्या नामकरणावरूनच राजकीय चर्चा रंगली आहे.