मुंबईच्या ऐतिहासिक ‘टर्मिनल-१’चा अखेरचा श्वास; आता १० कोटी प्रवाशांची नवी मुंबईकडे ‘धावपळ!८४ वर्षांचा ‘पहारा’ संपला!

मुंबईच्या ऐतिहासिक ‘टर्मिनल-१’चा अखेरचा श्वास; आता १० कोटी प्रवाशांची नवी मुंबईकडे ‘धावपळ!८४ वर्षांचा ‘पहारा’ संपला!
  • Positive News
  • ऑक्टोबर 6 2026

Share on  

मुंबईच्या ऐतिहासिक ‘टर्मिनल-१’चा अखेरचा श्वास; आता १० कोटी प्रवाशांची नवी मुंबईकडे ‘धावपळ!८४ वर्षांचा ‘पहारा’ संपला!


Terminal 1 : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ऐतिहासिक 'टर्मिनल १' अखेर ८४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासांनंतर आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. २५ ऑक्टोबर २०२६ पासून हे जुने Terminal 1 पूर्णपणे बंद होणार असून, त्याच्या जागी नवी आधुनिक इमारत उभारली जाणार आहे. २०२९-३० पर्यंत ही नवी इमारत आकारास येईल, अशी अपेक्षा आहे.

८४ वर्षे मुंबईच्या आणि देशाच्या लाखो-कोटी प्रवाशांचे स्वागत करणारे हे Terminal 1 आता काळाच्या पडद्याआड जात आहे, ही गोष्ट भावनाप्रधान माणसाच्या मनाला नक्कीच पाझर फोडणारी आहे. ज्या इमारतीने गजबजलेले प्रवासी, निरोपाचे अश्रू आणि स्वागताचे हसू वर्षानुवर्षे पाहिले; ती वास्तू आता १५ जानेवारी २०२७ पासून पाडकामाच्या हातोड्यांचे घाव झेलणार आहे. काळाचा महिमाच असा असतो, की जुन्याला बाजूला सारून नव्याला जागा करून द्यावी लागते!

या पुनर्विकास योजनेमुळे जवळपास १० कोटी प्रवाशांच्या प्रवासाचे मार्ग बदलणार आहेत. टर्मिनल १ वरील विमानांची ये-जा आता मुंबईतील टर्मिनल २ (T2) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) या दोन्ही ठिकाणी विभागली जाईल. एमआयएएलचे (MIAL) मुख्य विमानतळ अधिकारी विष्णू मोहन झा यांनी नागरी हवाई वाहतूक सचिवांना लिहिलेल्या पत्रानुसार, टप्प्याटप्प्याने हे स्थलांतर होणार आहे. २५ ऑक्टोबरपासून T1 वरील एक-तृतीयंश वाहतूक T2 कडे, तर उर्वरित मोठ्या प्रमाणातील उड्डाणे नवी मुंबईकडे वळवली जातील.

या निर्णयाचा थेट फटका मुंबईकरांना आणि रोजच्या प्रवाशांना बसणार आहे. आता मुंबईकरांना विमानाचे उड्डाण धरण्यासाठी नवी मुंबईचा लांबचा रस्ता तुडवावा लागेल. यात वेळ तर जाईलच, पण खिशालाही चांगलाच चाट पडेल! मुंबई ते नवी मुंबई दरम्यानच्या अगोदरच गजबजलेल्या रस्त्यांवर वाहनांचा अतिरिक्त ताण येऊन वाहतुकीचा पार बोजवारा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रवाशांसाठी हा रस्तेप्रवास चांगलाच त्रासाचा आणि डोकेदुखीचा ठरणार आहे.

मात्र, या नाण्याला दुसरी बाजूही आहे. एकाच धावपट्टीवर रात्रंदिवस ताण सहन करणाऱ्या मुंबई विमानतळाचा श्वास आता काहीसा मोकळा होईल. हवेत विमानांना द्यावे लागणारे फेरे, टेकऑफसाठी होणारी दिरंगाई आणि विमानतळावरील गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी होईल.

माणसाला विकासाची नवी पाऊलवाट धरताना जुन्या आठवणींचा निरोप घ्यावाच लागतो. ८४ वर्षांचे हे जुने Terminal 1 बंद होताना प्रवाशांच्या मनात आठवणींचे काहूर उठल्याशिवाय राहणार नाही, हेच खरे !

संबंधित बातम्या