मुंबई, ४ ऑगस्ट : राज्यात खासगी वाहनांवर बेकायदेशीरपणे 'पोलीस' असे नाव, पाटी किंवा स्टिकर लावून फिरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. महाराष्ट्र वाहतूक विभागाने याबाबत राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्पष्ट निर्देश जारी केले असून, अशा वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस ओळखीचा गैरवापर करणाऱ्यांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यात काही नागरिक खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी, स्टिकर किंवा नाव लावून वाहनांचा वापर करत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. अशा वाहनांचा वापर करून काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन, अवैध कामकाज तसेच सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल होत असल्याची बाबही निदर्शनास आली होती.
याच पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे अशा वाहनांची तपासणी करून संबंधितांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अर्जदार सखाराम कुलकर्णी यांनी खासगी वाहनांवर 'पोलीस' नावाचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.