पाऊल व पाय   

पाऊल व पाय   
  • Positive News
  • जुलै 9 2025

Share on  

     पाऊल व पाय :पायवाट ही अनेकांच्या चालण्यातून तयार होते...
 पण,
  पाऊलवाट मात्र आपल्या 'चाल'ण्यातून निर्माण करायची असते.... मागच्या वाटसरूंसाठी !

पाऊल व पाय हे दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात...
पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात...

पाऊल नाजूक व मुलायम..
 तर पाय भक्कम अन् मजबूत ..!!

पाऊलखुणा उमटतात तर पायांचे ठसे ...!!

पाऊलवाटेवर कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते.. 
पण पायवाट ही अनेकांच्या चालण्यामुळेच बनते..!

पाऊल जपून टाकायचे असते... 
पण पाय हा रोवायचा असतो.. !!

काय कमाल आहे बघा...
नावडत्या व्यक्तीच्या घरी "कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही" असे आपण म्हणतो...
पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र आपला पाय लवकर निघत नाही..!!

पाऊलावर पाऊल ठेवून चालता येते पण पायात पाय घालून पाडले जाते. 

आवडत्याच्या घरातून निघताना पाऊल अडखळते पण त्याच्या घरी जाताना मात्र पाय ठरत नाही.

पाऊले धुतली जातात तर पाय धूळ झटकली जाते.

नको त्या ठिकाणी  पाऊल घसरते.. 
तर बहारदार संगीत मैफिलीत पाय रेंगाळत राहतो !

पाऊल वाकडे पडले तर पायांचा  व पर्यायाने माणसाचा मार्ग व दिशा चुकते !

जीवनात किंवा  व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो... 
 पण पुढे आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा कधी इतरांसाठी केलेली पायपीट याची दखल घेतली जाईल याची काही शाश्वती नाही.

बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो

तरीही...

जन्माला येताना स्वतःच्या पावलांनी न येणारे आपण...
परत जातानादेखील आपल्या पायांनी जात नाही... 

एवढंच काय ते दोघांत साम्य आहे...!
  
    
 

संबंधित बातम्या