हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) ही एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. अनेकदा तो अचानक आणि तीव्र वेदनांसह येतो, अशी सामान्य धारणा असली तरी काही वेळा तो कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवायही होऊ शकतो. अशा प्रकाराला ‘सायलेंट हार्ट अटॅक’ म्हटले जाते, जो अधिक धोकादायक ठरू शकतो.
सायलेंट हार्ट अटॅकचे लक्षणे खूप सौम्य, अस्पष्ट आणि दैनंदिन थकवा, अॅसिडिटी किंवा तणाव म्हणून दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे अनेकदा उपचार उशिरा मिळतात आणि हृदयाचे गंभीर नुकसान होऊ शकते.
सायलेंट हार्ट अटॅक तेव्हा होतो जेव्हा हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो किंवा तो कमी होतो. लक्षणे तीव्र नसल्यामुळे रुग्णाला याची जाणीवही होत नाही, पण आतून हृदयाचे नुकसान सुरूच असते.
हा प्रकार खालील लोकांमध्ये अधिक दिसून येतो:
मधुमेह असलेले रुग्ण
महिला
वृद्ध व्यक्ती
लक्षणे अनेकदा आठवडाभर आधीपासून हळूहळू सुरू होतात.
1. सतत वाढणारा थकवा:
विश्रांती घेतल्यानंतरही थकवा कमी होत नसेल, तर तो गंभीर इशारा असू शकतो.
2. श्वास घेण्यास त्रास:
थोड्या हालचालीनंतरही दम लागणे किंवा वारंवार थांबावे लागणे.
3. चक्कर येणे किंवा मळमळ:
अचानक हलके वाटणे, मळमळ किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे.
4. झोपेचा त्रास आणि अस्वस्थता:
रात्री अचानक जाग येणे, चिंता वाढणे किंवा बेचैनी जाणवणे.
5. अधूनमधून छातीत अस्वस्थता:
छातीत हलका त्रास किंवा दडपण जाणवणे, जो अनेकदा अॅसिडिटी म्हणून दुर्लक्षित केला जातो.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे ओळखण्यात उशीर झाल्यास उपचार उशिरा होतात, ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गंभीर शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते आणि औषधोपचारांद्वारे हृदयाचे आरोग्य जपता येते.
आपले शरीर वेळोवेळी काही सूक्ष्म संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. जर वरीलपैकी कोणतीही लक्षणे सतत जाणवत असतील, तर त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्या. जागरूकता आणि वेळेवर कृती यामुळे जीव वाचू शकतो.
Disclaimer:
ही माहिती केवळ शैक्षणिक व जनजागृतीसाठी आहे. याचा वैद्यकीय सल्ला म्हणून वापर करू नये. कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.