खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा सुरू

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा सुरू
  • Positive News
  • जुलै 29 2026

Share on  

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा सुरू

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आधुनिक संपर्क व्यवस्थेचा शुभारंभ

मुंबई, दि. 29 जुलै : महाराष्ट्रातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत सॅटेलाईट फोन सुविधा सुरू केली आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभाग तसेच बीएसएनएल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच मच्छिमारांना सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. या सुविधेमुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातही किनाऱ्याशी अखंड संपर्क साधणे शक्य होणार आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा संपर्क तुटण्याच्या समस्या निर्माण होतात. बीएसएनएलच्या ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिस (GSPS) तंत्रज्ञानावर आधारित ही सेवा मच्छिमारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खराब हवामान, यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा अन्य संकटांच्या वेळी तातडीने संपर्क साधून मदत मिळविणे आता अधिक सुलभ होणार आहे.

या सुविधेमुळे मत्स्य नौकांचा किनाऱ्याशी सातत्यपूर्ण संपर्क कायम राहणार असून शोध व बचाव मोहिमांना अधिक गती मिळेल. तसेच हवामान आणि सुरक्षाविषयक इशारे वेळेवर मिळाल्याने समुद्रातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

शासनाच्या ‘मच्छिमार सुरक्षा प्रथम’ या धोरणानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक बनविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

अस्वीकरण : सदर वृत्त शासनाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार तयार करण्यात आले असून यातील माहिती वेळोवेळी बदलू शकते. अधिकृत माहितीसाठी संबंधित शासकीय विभागाशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या