वृत्तसंस्था, सेंट लुईस : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने प्रतिष्ठेच्या सिंकेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसर्या फेरीत उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोवचा भक्कम बचाव भेदत विजयाची नोंद केली. जगज्जेतेपद लढतीचा आव्हानवीर असलेल्या सिंदारोवविरुद्ध पांढर्या मोहर्यांनी खेळताना प्रज्ञानंदने झुंजार खेळाचे दर्शन घडवताना बाजी मारली. दोन डावांनंतर त्याच्या खात्यात १.५ गुण जमा झाले आहेत.
काळ्या मोहर्यांनी खेळताना सिंदारोवने अपेक्षेप्रमाणे बचावावर भर दिला. त्यामुळे प्रज्ञानंदच्या आक्रमकतेची कसोटी लागली. 'क्वीन्स पॉन ओपनिंग' पद्धतीने सुरू झालेल्या डाव पुढे गुंतागुंतीचा होत गेला. अखेरच्या टप्प्यात सुरुवातीला दोन्ही खेळाडूंची स्थिती समसमान असल्याने डाव पूर्णपणे बरोबरीचा असल्याचे संगणकीय विश्लेषणातून दिसत होते. मात्र, प्रज्ञानंदने प्रत्येक चालीत प्रतिस्पध्र्यावर दडपण कायम ठेवले. तब्बल ९५ चालींपर्यंत रंगलेल्या या लढतीत प्रज्ञानंदने आपली संयम आणि तांत्रिक कौशल्याची ताकद सिद्ध केली. त्याने सिंदारोवला सतत निर्णय घेण्यास भाग पाडत अखेर पूर्ण गुणाची कमाई केली.
दुसरीकडे, अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला नेदरलँड्सच्या अनिश गिरीविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनने जर्मनीच्या व्हिन्सेंट केमेरवर मात केली. अमेरिकेच्याच वेस्ली सो याने नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टला, तर फ्रान्सच्या मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह याने अमेरिकेच्या सॅम्युएल सेव्हियनला पराभूत केले. त्यामुळे दोन फेर्यांअंती प्रज्ञानंदसह कारुआना, अरोनियन, वेस्ली सो आणि व्हॅचिएर-लाग्रेव्ह प्रत्येकी दीड गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.