क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या मधल्या वेळेत थांबता आलं पाहिजे : डॉ. संजय मालपाणी 

क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या मधल्या वेळेत थांबता आलं पाहिजे : डॉ. संजय मालपाणी 
  • Positive News
  • मे 20 2026

Share on  

क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या मधल्या वेळेत थांबता आलं पाहिजे : डॉ. संजय मालपाणी 

वसंत व्याख्यानमालेत केले विवेक जागृतीचे महत्वपूर्ण विवेचन 

नाशिक : विजय मिळवायचा असेल तर कुठेतरी थांबता आलं पाहिजे. असे थांबणे ही एक कला आहे. हे थांबणे म्हणजे विवेकपूर्ण जागृती आहे. मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात कुणी थांबायलाच तयार नाही. क्रियेच्या आधीच आपण प्रतिक्रिया देवून मोकळे होतो. त्या ऐवजी आपल्याला मधल्या वेळेत थांबता आले पाहिजे. असे प्रतिपादन प्रथितयश उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी येथे केले.

नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या 103 वर्षांच्या परंपरेत सोमवारी डॉ. मालपाणी यांनी 19 वे पुष्प गुंफले. त्यावेळी स्व. दौलतराव आहेर स्मृती व्याखानात ते 'थांबण्याची कला' या विषयावर  बोलत होते. सप्तश्रुंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे विश्वस्त संदीप पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. दौलतराव आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सुरेश केला यांनी स्वागत केले. दरम्यान, व्याख्यानमालेनिमित्त राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात आज  श्रध्दा कराळे यांनी आपल्या वारली चित्रकृती सादर केल्या.  कौशल्यपूर्ण रेखाटनाच्या माध्यमातुन निर्मित या कलाकृती रसिक नाशिककरांना मनापासून आवडल्याची प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केली. वारली चित्रकार कराळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या हातून काहीतरी राहूनच जातं. त्यामुळे यश आपल्याला हुलकावणी देत असतं. अशावेळी क्षणभर थांबून लांब पल्ला गाठण्याचं कसब कसं आत्मसात करायचं याचे अत्यंत मार्मिक विवेचन श्री. मालपाणी यांनी यावेळी केले. भगवान गौतम बुध्द आणि अंगुली माल यांच्या संदर्भातील कथा सांगुन ते म्हणाले की, कसं आणि कुठं थांबलं पाहिजे ही कला प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. यासाठी त्यांनी भगवद् गीतेतील प्रसंगांचाही दाखला दिला. यामध्ये त्यांनी कृष्णनीती, आर्जुनाचं गलबलून जाणं, युध्दाचा प्रसंग, शंखनाद आदींचे यथोचित वर्णन केले. त्याचबरोबर आजच्या परिस्थितीत नीट परीक्षा, पेपर फुटी, विद्यार्थी आणि पालकांची गुणांची अपेक्षा आदींचाही थोडक्यात आढावा घेत त्यांनी दैनंदिन व्यवहारात बघावयास मिळणारी अनेक उदाहरणं त्यांनी दिली. त्याचप्रमाणे आज घराघरात बघावयास मिळणारा विसंवाद, शरीरासोबतच भावना थांबवून विवेक निर्माण करणं आदींचाही उल्लेख त्यांनी केला. स्मित हास्य हा एक असाच उपचार आहे, ज्यामुळे आपलं जगणं समृद्ध होतं. तसंच क्रियेनंतरची विवेकपूर्ण प्रतिक्रिया म्हणजे थांबण्याची कला आहे. त्यासाठी आपल्याला सहा इंद्रियांचं संयमन जमलं पाहिजे. हे ज्याला जमलं त्याचं आयुष्य समृद्ध होणारच, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपली बसण्याची पद्धत जरी बदलली तरी आपण निरोगी आयुष्य जगु शकतो, हेदेखील त्यांनी सोदाहरण पटवून दिले
---
*'दिल से दिल तक'मध्ये सुमधुर गाण्यांची मेजवानी*
दुसऱ्या सत्रांत सु- संस्कृती फाऊंडेशनतर्फे 'दिल से दिल तक' या सुमधुर गाण्यांच्या कार्यक्रमात रसिकांनी जुन्या काळातील हृदयस्पर्शी आणि एकापेक्षा एक सरस गितांची मेजवानी अनुभवली. धनंजय जैन यांच्यासह chanch चौधरी, उमेश पवार' प्रशांत पानदारे, राजश्री सोनजे, गीता बोरीचा आदी सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या संगीतमय कार्यक्रमात तल्लीन झालेल्या श्रोत्यांनी मनमुराद आनंदाची लयलूट करत जवळपास सर्वच गाण्यांना उत्स्फूर्त दाद दिली. श्री. जैन यांच्यासह सर्वच कलावंतांनी केलेला सराव आणि प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे रसिकांची वाहवा मिळविली. 
---
*आजचा कार्यक्रम (दि. 20)*
1) भाकरीचा चंद्र - नारायण सुर्वे 
लेखन : दत्ता पाटील 
दिग्दर्शन : सचिन शिंदे 
सहभागी कलावंत : राजेंद्र उगले, अरुण इंगळे, राम वाणी, विक्रम नन्नावरे, सचिन शिंदे आणि श्रद्धा देशपांडे
2)  सुहास वैद्य प्रस्तुत 'सुशीर संवाद' 
3) चित्रप्रदर्शन : विजय बोरसे

संबंधित बातम्या