नाशिक : स्वरालय म्युझिक अकॅडमी नाशिक यांच्या वतीने आयोजित आणि आकाश डेव्हलपर्स, निशम डेव्हलपर्स, व हॉटेल दुर्गा यांनी प्रायोजित केलेला हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम येत्या ५ जुलै रोजी विशाखा हॉल कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या गाण्याच्या कार्यक्रमाद्वारे नवोदित गायकांना तसेच श्रोत्यांना विविध प्रकारच्या गाण्यांचा आस्वाद घेता येणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून स्वरालय म्युझिक अकॅडमीच्या वतीने नवोदित गायकांना विविध पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात येते तसेच प्रत्येक इच्छुक गायकाचा स्वतंत्र अभ्यास करून त्याच्या आवाजावरील किंवा आवाजामधील दोष दूर करून सुगम संगीताच्या सरगम च्या माध्यमाने ते दोष दूर करण्याचा प्रयत्न राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र तिडके कॉलनी येथे होत असतो. स्वरालय म्युझिक अकॅडमी च्या वतीने विविध वयोगटातील महिला व पुरुषांना सुगम संगीताचा आनंद कसा घ्यावा याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येते. तसेच व्यासपीठावरील व्यावसायिक रंगभूमीची ओळख देखील करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. हा अभ्यास गजानन पळसोदकर गेल्या २५ वर्षांपासून नाशिक येथे करत आहेत. श्री पळसोदकर यांनी विविध प्रयोग नवोदित गायकांवर केले उदा. ज्यांना उत्कृष्ट गाता येतं त्यांना ताल समजत नाही आणि ज्यांना ताल समजतो त्यांच्या गळ्यात स्वर नाही. मात्र स्वरालय म्युझिक अकॅडमीमध्ये याविषयीचे विविध प्रयोग करून हे सिद्ध करण्यात आले आहे की बेसुर गायक देखील स्वरांमध्ये गाऊ शकतो आणि ताल कच्चा असलेला नवोदित गायक याला ताल चांगला समजू शकतो. याच प्रयोगांच्या आधारे गेल्या २० ते २४ वर्षाचा अनुभव लक्षात घेता या सर्व अनुभवांचा एकत्रित प्रयोग करण्यात यावा अशी इच्छा स्वरालय परिवाराची होती सुदैवाने त्याला आकाश डेव्हलपर्स, निशम डेव्हलपर्स आणि हॉटेल दुर्गा यांचे सहकार्य लाभले आणि हा प्रयोग नाशिक येथे ५ जुलै रोजी विशाखा सभागृह कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड येथे सायंकाळी ६ वाजता सादर होत आहे. कार्यक्रमाचे शीर्षकच "रंग स्वरांचे" असल्यामुळे हा कार्यक्रम कोणत्याही थीमवर आधारित नसून चित्रपट संगीत, भावगीत, भक्तीगीत, गझल, कव्वाली इत्यादी प्रकारांवर अवलंबून असेल. स्वरालय म्युझिक अकॅडमी चे मार्गदर्शक गजानन पळसोदकर हे स्वतः हा कार्यक्रम स्थानिक इतर कलावंतांच्या सहकार्याने सादर करत आहेत. याकरिता स्वरालय म्युझिक अकॅडमीच्या श्री संजय जोशी यांची मोलाची मदत लाभली असून या कार्यक्रमाकरिता तबला गौरव तांबे, ढोलकी व ढोलक देवाशिष पाटील, कीबोर्ड जितेंद्र सोनवणे आणि निवेदन वैशाली आठल्ये व मधुवंती देशपांडे या करणार आहेत. या कार्यक्रमाकरिता ध्वनी संयोजन श्री सचिन तिडके हे जबाबदारी सांभाळणार आहेत. मुळात या कार्यक्रमात सुगम संगीताच्या विविध गाण्यांचे स्वर त्याच्या सादरीकरण हा एक अभ्यासाचा विषय म्हणून सादरीकरण होत आहे. तसेच सदरील कार्यक्रम हा सर्वांना मोफत आहे. स्वरालय म्युझिक अकॅडमी व प्रायोजक आकाश डेव्हलपर्स व निशम डेव्हलपर्स आणि हॉटेल दुर्गा यांनी सर्व इच्छुक श्रोत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेले आहे. अशी माहिती नाशिक जिल्हा आर्केस्ट्रा असोसिएशनचे प्रसिद्धीप्रमुख श्री शैलेंद्र साळी यांनी दिली