रत्नागिरीत ऑक्टोबर हिटचा कहर; तब्बल १४३ वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद, कोकणात ‘यलो अलर्ट’

रत्नागिरीत ऑक्टोबर हिटचा कहर; तब्बल १४३ वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद, कोकणात ‘यलो अलर्ट’
  • Positive News
  • ऑक्टोबर 14 2026

Share on  

रत्नागिरीत ऑक्टोबर हिटचा कहर; तब्बल १४३ वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद, कोकणात ‘यलो अलर्ट’

रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला असून तापमानाने मागील सर्व ऐतिहासिक विक्रम मोडीत काढले आहेत. रत्नागिरीमध्ये कमाल तापमानाचा पारा चक्क ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने तब्बल १४३ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने येथील हवामानाचे जुने विक्रम मोडीत निघाले असून, संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तब्बल ७.६ अंशांनी अधिक नोंदवला गेला असून, हवामान विभागाने उष्ण आणि दमट वातावरणामुळे कोकणातील बहुतांश भागांत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

कोकण किनारपट्टीवर यंदा पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले तसेच मोसमाच्या सुरुवातीच्या काळात पावसाने वारंवार खंड दिला. परिणामी नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही पारा ३८ अंशांवर गेला असून सांताक्रूझ केंद्रात ७५ वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाच्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी हर्णे येथे ३८.५ अंश सेल्सिअस (सरासरीपेक्षा ७.४ अंशांनी अधिक), डहाणू येथे ३६.२, अलिबाग येथे ३३.२ तर ठाणे येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यावर्षीच्या नोंदी ऑक्टोबर महिन्यातील उच्चांकी तापमानाच्या पहिल्या चार क्रमांकांमध्ये समाविष्ट झाल्या आहेत.

दरम्यान, मंगळवारीही उष्ण व दमट हवामानाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून सिंधुदुर्ग वगळता उर्वरित कोकणात सरासरीहून अधिक तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार किनारपट्टी भागात पावसाच्या तुरळक सरींची शक्यता असली तरी वाढत्या उकाड्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हात फिरणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या