मुंबई : राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट अथवा निकृष्ट औषधे आणि बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक होत असतानाच, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांबाबत प्रथमच महत्त्वाचे भाष्य केले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, राज्य सरकारचा भर 'सेफ फूड, सेफ ड्रग्ज आणि सेफ महाराष्ट्र' या संकल्पनेवर आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामाचा थेट संबंध राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी तसेच शेतकऱ्यांशी आहे. त्यामुळे अन्नपदार्थ आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
राज्यात सुरक्षित अन्न आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करून 'सेफ महाराष्ट्र' हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सर्व पाठबळ देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे.
दूधातील भेसळ, मिठाईतील गैरप्रकार, बेकायदेशीर गुटखा विक्री यांसह अन्न आणि औषधांच्या गुणवत्तेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आगामी काळातही कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर FDAचा कारवाईचा बडगा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.