आता राज्यातील पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी 'ऑनलाइन हजेरी' बंधनकारक; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

आता राज्यातील पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी 'ऑनलाइन हजेरी' बंधनकारक; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
  • Positive News
  • ऑक्टोबर 15 2026

Share on  

आता राज्यातील पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी 'ऑनलाइन हजेरी' बंधनकारक; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय


 राज्यातील शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी आता 'ऑनलाइन हजेरी' नोंदवणे बंधनकारक करण्यात आले असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण आयुक्तालय कार्यालयाकडून यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.

ही स्मार्ट हजेरी प्रणाली राबवण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रथम 'स्विफ्टचॅट' हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी करायची आहे. त्यानंतर ॲपमधील 'स्मार्ट हजेरी बॉट' सुरू करून शाळेचा ११ अंकी युडायस संकेतांक आणि शिक्षकांचा शालार्थ किंवा राष्ट्रीय शिक्षक संकेतांक नोंदवून 'शिक्षक हजेरी' पर्यायाद्वारे हजेरी नोंदवता येईल. याद्वारे शिक्षक उपस्थित, गैरहजर, अर्धी रजा, पूर्ण रजा किंवा प्रशिक्षणासाठी उपस्थित असल्याच्या सर्व नोंदी सहज करता येणार आहेत.

केवळ शिक्षकाच नव्हे, तर त्यांच्यासोबतच विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी नोंदवण्याची सुविधाही या प्रणालीत देण्यात आली आहे. याद्वारे वर्गशिक्षकांना 'विद्यार्थी हजेरी' या पर्यायाचा वापर करून विद्यार्थ्यांची तुकडी निवडून गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करता येईल व हजेरी अहवाल तयार करता येईल.

या प्रक्रियेसाठी काही निश्चित नियम ठरवण्यात आले आहेत. शाळांच्या वेळेनुसार सकाळी ९ ते दुपारी १२, तसेच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शाळा सुरू असलेल्या ठिकाणी हजेरी नोंदवणे बंधनकारक आहे. ज्या शाळांमध्ये शालार्थ प्रणालीवर माहिती उपलब्ध आहे, तिथे शालार्थ क्रमांक वापरला जाईल; तर इतर शाळांसाठी युडायस प्लस प्रणालीवरील राष्ट्रीय शिक्षक संकेतांकाच्या आधी 'NT' हा उपसर्ग लावून नोंदणी करावी लागणार आहे.

शिक्षकांची ही ऑनलाइन हजेरी नियमितपणे नोंदवली जात आहे की नाही, यावर शिक्षण विभागातील अधिकारी बारीक लक्ष ठेवणार आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांच्या हजेरीवर कडक नजर ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या