निवृत्तीनाथ महाराज पालखीचा संगमनेर तालुक्यात प्रवेश
अहिल्यानगर : शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आगमन झाले. 20 हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात संगमनेरात प्रवेश केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांची सर्व सुविधा करण्यात आल्या असून, रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तीमय वातावरणात माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले.
- पंढरपूर साठी निघालेल्या या पालखीचे सुमारे 20 हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. यावेळी माजी आमदार, डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत थोरात यांनी पालखीचे पूजन केले. याप्रसंगी समवेत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते. रिमझिम पावसात सुमारे अश्विनाथ विद्यालयाचे लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.