नागपूरच्या डबल डेकर व्हायडक्ट (मेट्रो)ची जागतिक स्तरावर नोंद!
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील कामठी महामार्गावर 5.6 किमी लांबीचा सर्वात मोठा डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) उभारल्याबद्दल महामेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
भारतामध्ये सर्वाधिक लांबीचा हा डबल डेकर व्हायाडक्ट स्थापत्यकलेचे आणि तंत्रज्ञानाचे अद्भुत उदाहरण आहे. सिंगल कॉलम पिअरवर उभारलेला हा 5.62 किमीचा चारपदरी उड्डाणपूल हा पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिनीवर आधीच असलेला मार्ग अशा बहुस्तरीय वाहतूक व्यवस्थेने सज्ज आहे. गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक ही 5 मेट्रो स्थानके या उड्डाणपुलावर उभारण्यात आली आहेत.
देशात पहिल्यांदाच 1650 टन क्षमतेचे निर्माण कार्य शहरी भागात पूर्ण झाले. 'रिब अँड स्पाइन' तंत्रज्ञानाचा वापर करून या अवघड प्रकल्पाची यशस्वी उभारणी करण्यात आली. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली असून, वेळ आणि इंधनाची मोठी बचत होऊन नागरिकांना दिलासा मिळत आहे.
महामेट्रोने यापूर्वी वर्धा मार्गावर 3.14 किमी लांबीचा डबल डेकर व्हायाडक्ट बांधून 2022 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. आता कामठी मार्गावरील हा प्रकल्प त्या विक्रमालाही मागे टाकत नवीन इतिहास रचतो आहे.
यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.