मुंबईतील ‘ग्रीन बस स्टॉप’ – शहरात उगवलेले छोटे जंगल : (हीलर अंजली जाधव)

मुंबईतील ‘ग्रीन बस स्टॉप’ – शहरात उगवलेले छोटे जंगल : (हीलर अंजली जाधव)
  • Positive News
  • जानेवारी 7 2026

Share on  

मुंबईतील ‘ग्रीन बस स्टॉप’ – शहरात उगवलेले छोटे जंगल : (हीलर अंजली जाधव)

मुंबईसारखं मोठं शहर कधी झोपत नाही.
इथे माणसं धावतात, विचार धावतात… आणि बऱ्याचदा मन मात्र थकून जातं.
गर्दी, हॉर्नचा आवाज, धूर, वेळेचा ताण — या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो.
अशा वातावरणात, रस्त्याच्या कडेला दिसणारे हिरवे बस स्टॉप, झाडांनी वेढलेली छोटी जागा किंवा फुलांनी सजलेला एखादा कोपरा —
मनाला नकळत सांगतो:
“थांब… श्वास घे… सगळं च एवढं  काही वाईट नाही.”

धावपळीच्या, गर्दीच्या आणि प्रदूषणाने भरलेल्या शहरात जर एखादी गोष्ट क्षणभर थांबून श्वास घ्यायला भाग पाडत असेल, तर ती नक्कीच लक्ष वेधून घेते.
मुंबईतील काही भागात दिसणारे, फुलांनी आणि हिरव्या झाडांनी सजलेले बस स्टॉप हे याचं सुंदर उदाहरण आहे.
हे बस स्टॉप म्हणजे फक्त प्रवाशांची वाट पाहण्याची जागा नाही, तर शहरात उगवलेली छोटी हिरवी जंगलं आहेत.

मुंबई महानगरपालिका आणि BEST उपक्रमांतर्गत काही ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात  अंधेरी वेस्ट मध्ये हे  बागबागीचा ग्रीन बस स्टॉप उभारले आहेत.
या बस स्टॉपवर:
कुंड्यांमध्ये झाडे,
लटकती फुलझाडे,
वेलवर्गीय वनस्पती,
नैसर्गिक सावली
अशा प्रकारे संपूर्ण बस स्टॉप हिरव्या आवरणात गुंडाळलेला असतो.

दिसायला  सुंदर, प्रसन्न आहेतच त्यासोबत 
प्रदूषण कमी करण्यास मदत होते .
झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि हवेत ऑक्सिजन वाढवतात हे सगळ्यांनाच माहीत आहे . झाडांमुळे उष्णता पण कमी होते
साध्या बस स्टॉपपेक्षा येथे तापमान थोडे थंड जाणवते.
मानसिक ताण कमी होतो
हिरवा रंग, फुले आणि निसर्गदृश्य मन शांत करतात.
गर्दीत उभा असलेला, त्रासलेला  प्रवासी काही क्षण तरी रिलॅक्स होतो.

शहर सौंदर्यीकरण
रस्त्याच्या कडेला असलेले हे बस स्टॉप शहराला वेगळाच सुंदर चेहरा देतात.

त्यासोबत ते मानसिक आरोग्य पण देतात .
आज शहरातील अनेक लोक ताण, चिंता, अस्वस्थता आणि थकवा अनुभवतात.
संशोधनानुसार:
निसर्गाच्या सान्निध्यात काही मिनिटे घालवली तरी मेंदू शांत होतो आणि तणाव कमी होतो.
हे ग्रीन बस स्टॉप प्रवाशांना रोजच्या प्रवासात निसर्गाशी छोटा पण महत्त्वाचा विसावा देतात.

 अशी कल्पना संपूर्ण भारतात गरजेची  आहे ना ? 
आज भारतातील बहुतांश शहरे:
गर्दीने भरलेली
प्रदूषित
मानसिक ताण वाढवणारी
अशा वेळी:
“संपूर्ण जंगल शहरात आणता येत नसेल, तर शहरात  अशी छोटी छोटी जंगलं नक्कीच उभारता येतील.”
ग्रीन बस स्टॉप, हिरवे वेटिंग एरिया, झाडांनी वेढलेली सार्वजनिक ठिकाणे — ही केवळ सजावट नसून आरोग्याची गरज आहे.

शरीराचं आरोग्य जसं महत्त्वाचं आहे, तसंच मनाचं आरोग्यही निसर्गाशी जोडलेलं आहे.
प्रत्येक शहराने, प्रत्येक समाजाने असा विचार करायला हवा की:
“आपण माणसांसाठीच नाही, तर त्यांच्या मनासाठीही जागा तयार करतोय. 

पण...... प्रश्न असा आहे की 
आपण अशी हिरवी जागा जपतो का? परदेशातील स्वच्छतेवर छान गप्पा मारतो पण आपल्या देशात काय करतो ? 
आज अनेकदा दिसतं...
बस स्टॉपवर कचरा टाकला जातो, तलावात निर्माल्य टाकून घाण केली जाते. 
पान खाऊन थुंकले जाते, पिशव्या, बाटल्या तिथेच फेकल्या जातात
“कोणी तरी साफ करेल” या मानसिकतेने आपण निघून जातो
पण लक्षात ठेवायला हवं:
शहर स्वच्छ ठेवणं ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाही —
ती प्रत्येक नागरिकाची भावनिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.
 मुंबई किंवा तुमचं जे कोणत शहर असेल ते  स्वच्छ ठेवण  काही कठीण नाही .....फक्त तुम्ही कचरा करू नका 
 कचरा कचरापेटीतच टाकणं
 सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळणं
 झाडं, कुंड्या यांची तोडफोड करू नका आणि सुंदर फुले, झाडे तोडून  नेऊ नका 

आपण ज्या वातावरणात राहतो, ते जर स्वच्छ, हिरवं आणि जपलेलं असेल —
तर मनाला शांत राहायला अधिक सोपं होतं.
सरकार जनतेसाठी काहीच करत नाही असे सतत बोलण्यापेक्षा जे केले आहे त्याला जपणे ही प्रत्येक नागरिकच जबाबदारी  आहे ना ? 

तुम्हाला काय वाटते ??????

संबंधित बातम्या