पायाभूत सुविधांनी सज्ज होते आहे मुंबई!

पायाभूत सुविधांनी सज्ज होते आहे मुंबई!
  • Positive News
  • ऑगस्ट 15 2025

Share on  

पायाभूत सुविधांनी सज्ज होते आहे मुंबई!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) विविध प्रकल्पांचे उदघाटन व लोकार्पण संपन्न झाले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले की, उद्यापासून मुंबई किनारी रस्ता नागरिकांसाठी 24 तास खुला राहील. मात्र, येथे वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी एमएमआरडीए सातत्याने प्रयत्नशील आहे. 2016 मध्ये बीकेसीसह परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी नियोजित केलेल्या 6 एक्झिटपैकी 5 एक्झिट पूर्ण झाले असून, उर्वरित 1 एक्झिट डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, यामुळे चेंबूरहून पश्चिम द्रुतगती महामार्गावर येणे आणि पूर्व उपनगरातून विमानतळावर जाणे अधिक सोपे होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प हे अभियांत्रिकी चमत्कार आहेत. मेट्रो, उड्डाणपुल आणि भुयारी मार्ग यांमार्फत शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भार कमी करण्यासाठी वांद्रे-वर्सोवा लिंक, वर्सोवा-दहिसर आणि दहिसर-भाईंदर लिंकचे काम वेगात सुरू आहे. यासोबतच 215 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल, इतर उड्डाणपुलांसह समांतर पश्चिम द्रुतगती महामार्ग तयार करत आहोत. 

2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मुंबई इन 59 मिनिट्स' या संकल्पनेप्रमाणे, मुंबईतील कोणत्याही भागातून 59 मिनिटांत दुसऱ्या भागात पोहोचता येईल. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध रस्ते, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक प्रकल्प हाती घेतले आहेत. सप्टेंबर व नोव्हेंबर महिन्यात मेट्रोच्या तीन नव्या लाईन्स टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठरवले आहे.

मंडाळे येथील मेट्रो प्रशिक्षण संस्था केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील मेट्रो प्रकल्पांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या संस्था ठरतील. मालवणीतील कर्मचारी निवासस्थानामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधा वाढतील आणि कार्यक्षमता सुधारेल.

मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ देणार नाही, तसेच विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे प्रकल्प आणि सुविधा देशवासीयांना आणि मुंबईकरांना भेट स्वरुपात देताना महाराष्ट्र शासनाला अतिशय आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री ॲड आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या