मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे क्रेडाई-एमसीएचआयचा 'चेंज ऑफ गार्ड 2025' कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून क्रेडाई-एमसीएचआयसह काम करण्याची संधी त्यांना मिळाली. क्रेडाई-एमसीएचआय ही संस्था केवळ बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठीच नव्हे, तर ग्राहक, संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्र आणि रहिवासी सुविधा विकसित करण्यासाठी सरकारसोबत सामंजस्याने कार्यरत आहे.
रेरा कायदा लागू करताना महाराष्ट्राने देशात पहिल्यांदाच पुढाकार घेतला होता. त्यावेळी क्रेडाई-एमसीएचआयने सक्रीय सहभाग नोंदवून नियमावली सुलभ आणि कार्यक्षम बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे महाराष्ट्रात RERA सर्वात यशस्वी ठरला.
एमएमआरडीए आणि सिडकोच्या सहकार्याने, भविष्यातील ग्रोथ हब असलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील नव्या शहरांमध्ये उद्योगांनी भागीदारी करावी, यासाठी जमिनी आणि परवानग्या राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जातील. या परिसरात डेटा सेंटर, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांचा विकास होणार असून, हे क्षेत्र भविष्यकाळात विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगर प्रदेशाच्या क्षमतेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याच्या ध्येयात एमएमआरची क्षमता 1.5 ट्रिलियन डॉलर्स आहे. अटल सेतू, ऑरेंज गेट टनेल, वरळी-शिवडी पूल यांसारख्या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि परवडणारी घरे उपलब्ध करण्याच्या संधी निर्माण होतील.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रेडाई-एमसीएचआयचे नवनियुक्त अध्यक्ष सुखराज नाहर आणि मावळते अध्यक्ष डॉमिनिक रोमेल यांचे तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी क्रेडाई-एमसीएचआयचे मावळते अध्यक्ष डॉमिनिक रोमेल, नवनियुक्त अध्यक्ष सुखराज नाहर, कवी आणि वक्ते डॉ. कुमार विश्वास तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.