आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिरमध्ये प्रदूषणमुक्त दीपावलीचा संदेश

आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिरमध्ये प्रदूषणमुक्त दीपावलीचा संदेश
  • Positive News
  • ऑक्टोबर 17 2025

Share on  

आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिरमध्ये प्रदूषणमुक्त दीपावलीचा संदेश

पर्यावरणपूरक दीपोत्सवातून भारतीय संस्कृतीची ओळख : ॲड. नितीन ठाकरे
नाशिक : अभिनव शाळेत पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेचाही सुंदर संगम दिसून येतो. येथे साजरा  करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक दीपोत्सवातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. यात दीपावलीतील प्रत्येक दिवसाचे वैज्ञानिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणे ही अतिशय चांगली बाब आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित गंगापूर रोडवरील आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिर शाळेत आयोजित पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दीपोत्सावाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. दीपोत्सवात सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांनी पारंपरिक संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधला. 
याप्रसंगी मविप्रचे चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, शिवाजी गडाख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिक्षणाधिकारी दौलत जाधव, डॉ. अजित मोरे, डॉ. कैलास शिंदे, शशिकांत मोगल, मुख्याध्यापक चंद्रजित शिंदे, पुष्पा लांडगे, ज्योती पवार, कारभारी तांदळे, निता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व मान्यवर व मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. संगीत शिक्षिका नंदिनी आहिरे व गीतमंच यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. सयाजीराव गायकवाड व डॉ. विजया गायकवाड यांच्या हस्ते दीपावली पूजन पार पडले. 
मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेचा आदर, संस्कृतीची जाण व पर्यावरणाबद्दलची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी शाळेत सतत विविध उपक्रम राबविले जातात. मॉन्टेसरी ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा या उपक्रमांमध्ये सहभाग असतो.”
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “मोबाइलचे दुष्परिणाम” या विषयावर नाटिका सादर करून सामाजिक संदेश दिला, तर “प्रदूषणमुक्त दीपावली” या विषयावर नृत्य सादर करून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला.
मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रतिभा बोऱ्हाडे व मुग्धा आहिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर रंजना पाटील यांनी आभार मानले. शाळेच्या सर्व शिक्षकवर्गाने, पालकांनी व समिती सदस्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी “प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ” घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये रुजली सांस्कृतिक मूल्ये
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी शाळेतील वर्गांमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज या सणांबाबत माहितीपर सादरीकरण करण्यात आले. वसुबारसनिमित्त प्रत्यक्ष गाय व वासराचे पूजन करण्यात आले. वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्या, तोरण, आकाशकंदील आणि पणत्या तयार करून शाळेची सजावट केली होती. आधुनिकतेबरोबर परंपरेचा वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन मांडले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीबरोबरच पर्यावरणप्रेम व सांस्कृतिक मूल्ये रुजविण्याचा शाळेचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
फोटो कॅप्शन 
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित गंगापूर रोडवरील आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिर शाळेत आयोजित पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दीपोत्सावाच्या उद्घाटनाप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, शिवाजी गडाख, डॉ. सयाजीराव गायकवाड, शिक्षणाधिकारी दौलत जाधव, मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, मुख्याध्यापक चंद्रजित शिंदे आदी मान्यवर.
 

संबंधित बातम्या