महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया : सहकार्याचे नवे पर्व!

महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया : सहकार्याचे नवे पर्व!
  • Positive News
  • सप्टेंबर 12 2025

Share on  

महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया : सहकार्याचे नवे पर्व!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (IABCA) ग्लोबल लीडर्स फोरम 2025' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या आर्थिक करारामुळे व्यापार आणि उद्योगक्षेत्रातील सहकार्यास नवे दालन खुले झाले असून महाराष्ट्र या सहकार्यात आघाडी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वाढवण बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर ठरणार असून हे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. त्यामुळे महाराष्ट्र जागतिक सागरी महासत्ता बनून जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच सुपर एक्स्प्रेसवेज नेटवर्कमुळे लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.

शैक्षणिक सहकार्यासाठी नवी मुंबई येथे एड्यु सिटी उभी राहत असून, येथे 12 जागतिक विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणार आहेत. यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे पहिले विद्यापीठ म्हणून सहभागी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कर्टीन विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) आणि गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) यांच्या सहकार्याने विकसित होणार्‍या कौशल्यप्रशिक्षित मनुष्यबळामार्फत गडचिरोली हे स्टील हब म्हणून विकसित होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत, भारत-ऑस्ट्रेलिया संबंध हे लोकशाही, अर्थव्यवस्था, शिक्षण, परस्पर विश्वास आणि सन्मान या आधारावर उभे आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी मंत्री जयकुमार रावल, ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन ओएएम व इतर मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या