नाशिक : नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या भव्य कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक वाहतूक पोलिसांच्या सेवेला सलाम करत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस असो, रस्त्यांची विकासकामे असोत किंवा वाढती वाहतूक कोंडी... नाशिक वाहतूक पोलीस प्रत्येक परिस्थितीत रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असतात.
त्यांच्या या निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा देत, Round Table Nashik 245 आणि Ladies Circle Nashik 204 यांनी नाशिक वाहतूक पोलिसांना ५० हाय-व्हिजिबिलिटी रिफ्लेक्टिव्ह सेफ्टी जॅकेट्स भेट दिली आहेत.
ही जॅकेट्स विशेषतः रात्रीच्या वेळी, खराब हवामानात आणि मोठ्या वाहतूक व्यवस्थापनादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांना अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत करणार आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढणार असून ते अधिक प्रभावीपणे आपली जबाबदारी पार पाडू शकतील.
कुंभमेळा २०२७ सारख्या जागतिक स्तरावरील धार्मिक सोहळ्यासाठी नाशिक सज्ज होत असताना, अशा सामाजिक उपक्रमांमुळे सुरक्षा व्यवस्थेला आणखी बळ मिळत आहे.
समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केली.