नाशिक: बाल हृदयविकार उपचार क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे महाराष्ट्रातील पहिली ओपन-हार्ट सर्जरीशिवाय ट्रान्सकॅथेटर फोंटान कंप्लिशन (Transcatheter Fontan Completion) प्रक्रिया ९ वर्षांच्या चिमुकलीवर यशस्वीरीत्या पार पडली आहे. या यशस्वी उपचारामुळे जन्मजात हृदयविकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नव्या आशेचा किरण मिळाला आहे.
जन्मतःच जटिल हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या या चिमुकलीवर यापूर्वी विविध टप्प्यांमध्ये उपचार झाले होते. कुटुंबासाठी हा प्रवास अत्यंत भावनिक आणि आव्हानात्मक ठरला होता. पुन्हा एकदा ओपन-हार्ट सर्जरीची शक्यता समोर असताना, किम्स मानवता हॉस्पिटलमधील अत्याधुनिक आणि कमी जोखमीच्या उपचारपद्धतीमुळे त्यांना दिलासा मिळाला.
ही प्रक्रिया डॉ. ललित लावणकर, सीनियर इंटरव्हेन्शनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. याबाबत बोलताना ते म्हणाले, “कॅथेटर-आधारित ही मिनिमली इन्वेसिव्ह पद्धत पारंपरिक ओपन-हार्ट सर्जरीचा सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे. यामुळे रुग्णाला कमी वेदना, कमी धोका आणि जलद बरे होण्याची संधी मिळते. पूर्वी अशा जटिल उपचारांसाठी दिल्ली किंवा चेन्नईसारख्या महानगरांकडे जावे लागत होते, मात्र आता ही सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध झाली आहे.”
ते पुढे म्हणाले, “जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांसाठी प्रत्येक उपचाराचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या प्रक्रियेनंतर रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली असून ऑक्सिजन पातळी वाढली, ऊर्जा सुधारली आणि बालक लवकरच सामान्य आयुष्याकडे परतले.” उपचारानंतर बालकाची प्रकृती उत्तम राहिल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
या यशाबद्दल मत व्यक्त करताना डॉ. राज नगरकर, मॅनेजिंग डायरेक्टर, किम्स मानवता हॉस्पिटल, म्हणाले, “उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हा आमचा ध्यास आहे. ही यशस्वी प्रक्रिया त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. एखाद्या लहानग्याला नवजीवन मिळणे ही केवळ वैद्यकीय यशोगाथा नसून संपूर्ण कुटुंबासाठी आशेचा किरण असतो.”
विशेष म्हणजे, किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत २०० पेक्षा अधिक बालहृदय शस्त्रक्रिया व प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या असून, हे रुग्णालय उत्तर महाराष्ट्रातील बालहृदय उपचारासाठी एक विश्वासार्ह आणि अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखले जाते.
‘ट्रान्सकॅथेटर फोंटान कंप्लिशन’ ही सिंगल व्हेंट्रिकल हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक उपचारपद्धती असून, या तंत्रज्ञानामुळे मोठी शस्त्रक्रिया टाळली जाते, गुंतागुंत कमी होते आणि रुग्ण लवकर बरा होतो.
या यशस्वी प्रक्रियेत डॉ. ललित लावणकर यांच्यासह डॉ. सारंग गायकवाड, डॉ. रचित मेहता, डॉ. सोनाली म्हात्रे, डॉ. मिलिंद गंगुर्डे, डॉ. किरण संधू आणि संपूर्ण टीमने मोलाची भूमिका बजावली.