इस्रो श्रीहरिकोटामध्ये उभारणार अंतराळवीर प्रशिक्षण व विलगीकरण केंद्र

इस्रो श्रीहरिकोटामध्ये उभारणार अंतराळवीर प्रशिक्षण व विलगीकरण केंद्र
  • Positive News
  • ऑगस्ट 13 2026

Share on  

इस्रो श्रीहरिकोटामध्ये उभारणार अंतराळवीर प्रशिक्षण व विलगीकरण केंद्र

बेंगळुरू | प्रतिनिधी

भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेची महत्त्वाकांक्षा केवळ २०२७ मध्ये नियोजित असलेल्या पहिल्या गगनयान मोहिमेपुरती मर्यादित राहणार नाही. भविष्यात नियमित मानवी अंतराळ मोहिमा राबविण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) श्रीहरिकोटा येथे अंतराळवीरांसाठी अत्याधुनिक क्रू आयसोलेशन फॅसिलिटी (विलगीकरण केंद्र) आणि ‘गगनयात्री निवास’ उभारणार आहे.

या प्रकल्पासाठी इस्रोने सुमारे २६.०२ कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या असून, या केंद्रात भविष्यातील अंतराळवीरांना प्रशिक्षण, शारीरिक व मानसिक तयारी तसेच अंतराळ प्रवासासाठी आवश्यक वातावरणाशी जुळवून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनयान मोहिमेनंतर भारत नियमित मानवी अंतराळ मोहिमा हाती घेण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठी केवळ हवाई दलातील वैमानिकांवर अवलंबून न राहता शिक्षक, वैद्यकीय तज्ज्ञ, वैज्ञानिक, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश असलेला अंतराळवीरांचा स्वतंत्र गट तयार करण्यात येणार आहे.

भारताच्या प्रस्तावित ‘भारतीय अंतराळ स्थानक’ (Bharatiya Antariksh Station - BAS) प्रकल्पालाही या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. या केंद्रात नासाच्या Mission Simulation and Training Facility (MSTF) प्रमाणे विविध अंतराळ परिस्थितींचे अनुकरण करणारी यंत्रणा टप्प्याटप्प्याने विकसित केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या पहिल्या भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षणासाठी रशिया आणि अमेरिकेची मदत घ्यावी लागली होती. मात्र, भविष्यातील अंतराळवीरांना संपूर्ण प्रशिक्षण भारतातच देण्याचे उद्दिष्ट इस्रोने ठेवले आहे.

डिस्क्लेमर

ही बातमी उपलब्ध वृत्तस्रोतांवर आधारित असून माहितीचे संकलन व भाषांतर करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या खर्च, कालावधी किंवा तांत्रिक तपशीलांमध्ये इस्रोकडून पुढील काळात बदल होऊ शकतात.

संबंधित बातम्या