आध्यात्मामुळे भारताचा जागतिक स्तरावर सन्मान!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळी, मुंबई येथे श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूरद्वारे आयोजित 'पर्युषण महापर्व 2025' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी उपस्थितांना पर्युषण महापर्वाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पर्युषण महापर्वानिमित्त आज 'श्रीमद् राजचंद्र पशुवैद्यकीय रुग्णालय, मुंबई'ची पायाभरणी झाली असून, ही मुंबईसाठी एक मोठी भेट आहे. यासोबतच येथे आयोजित केलेल्या युथ फेस्टिवलमुळे युवा पिढीस सकारात्मक मार्गदर्शन मिळणार आहे.
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून हजारो वर्षांपासून टिकून आहे आणि विकसित होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संस्कृतीने कधीही आध्यात्माचा मार्ग सोडला नाही. आपण आध्यात्मामध्ये विश्वास ठेवतो आणि यामुळेच जगाकडे पाहण्याची आणि विचार करण्याची आपली पद्धत वेगळी आहे.
भारतीय संस्कृतीनुसार, दुर्बल व्यक्तीला देखील जगण्याचा अधिकार आहे आणि त्याची काळजी समाज घेतो. आपली संस्कृती शिकवते की, समाजात वावरताना फक्त स्वतःचा नव्हे, तर इतर व्यक्ती, प्राणी, जीव आणि वनस्पती यांचा देखील विचार करावा. म्हणूनच जगातील लोक जेव्हा आध्यात्माचा विचार करतात, तेव्हा भारताकडे सन्मानाने पाहिले जाते, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.