वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी रिंग रोडपासून मल्टीस्पेशालिटी रुग्णालयापर्यंत महत्त्वाचे निर्णय!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे वसई-विरार महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसई-विरार महापालिका क्षेत्राचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता या भागासाठी नव्याने रिंग रोडचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश दिले. महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व कामांचा कालबद्ध कार्यक्रम ठरवून ती कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. तसेच महापालिकेच्या अखत्यारित नसलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रे तातडीने महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाल्याचे लक्षात घेता, येत्या एक महिन्याच्या आत गृह विभाग व महापालिकेने संयुक्तरीत्या कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भागात पार्किंगची समस्या बिकट असून, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पार्किंग झोन निर्माण करण्याची जबाबदारी परिवहन विभागाने घेण्याचे निर्देश देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जेथे रस्त्यांसाठी जागा उपलब्ध आहे, तेथे नगरविकास विभागाने निधी वितरीत करावा आणि महापालिकेने ही कामे तातडीने पूर्ण करावी. तसेच महापालिकेच्या नियोजनात आरोग्य, रस्ते, पूल, परिवहन, गृहनिर्माण या सर्व क्षेत्रातील प्रलंबित कामांना प्राधान्य देऊन कामांची गती वाढवावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
या भागातील बांधकामांना परवानगी देताना सर्व कायदेशीर बाबी काटेकोरपणे तपासाव्यात, असे सांगताना त्यांनी महापालिकेत फक्त नियमित अधिकाऱ्यांकडेच पदभार देण्याची सूचनाही केली. आचोळे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या कामालाही गती देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना राबवण्यात यावी व त्यात महापालिकेशी संबंधित सर्व बाबींचा समावेश करण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. डॉ. हेमंत सावरा, आ. राजन नाईक, आ. स्नेहा दुबे पंडित आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.