माणसांचे चार्जर – डॉ अंजली जाधव, ठाणे
आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यांना सुरू किंवा जिवंत राहण्यासाठी जसे चार्जर ची गरज असते त्याचप्रमाणेच माणसांचे आयुष्य सुरळीत चालण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्याही आयुष्यात काही चार्जर ची गरज असते. ते चार्जर नक्की कोणते ते आपण पाहूयात.
निसर्गाचा सहवास आणि निरोगी आयुष्य
आपण घरातील बरणीत धान्य ठेवले आणि ती बरणी काही दिवस उघडली नाही तर त्या धान्याला जाळी लागते, त्याला कीड लागते. कारण बंद बरणीत ते पंचतत्वापासून वंचित असते . माणसाचे पण अगदी तसेच आहे, जर तो निसर्गात न जाता घरातच बसून राहिला तर तो वरचेवर आजारी पडू लागतो कारण तो पंचतत्वापासून दूर असतो.
निसर्ग हा पंचतत्त्वांनी बनलेला आहे त्यामुळे
निसर्गात फिरायला गेल्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात. मानसिक तणाव कमी होतो.
निसर्गाच्या शांत वातावरणात ध्यानधारणा करणे, योग करणे, यामुळे मन शांत होते.
नियमितपणे निसर्गात फिरायला जाणे, धावणे, चालणे यामुळे शारीरिक व्यायाम होतो.
निसर्गात मिळणाऱ्या स्वच्छ हवेचा आणि सूर्यप्रकाशाचा सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
नैसर्गिक वातावरणात व्हिटॅमिन डी मिळते. त्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे निसर्ग नावाचा हा चार्जर आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे.
चांगले मित्र/मैत्रिणी
चांगल्या मित्रांची/मैत्रिणींची गरज आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. ते/त्या आपल्याला एकटेपणा, ताण, आणि निराशा यांपासून वाचवतात. आपल्याला जर कोणता मानसिक त्रास होत असेल तर तो बोलून दाखवण्यासाठी चांगले मित्र एक उत्तम आउटलेट बनतात . ते आपल्या जीवनात आनंद, प्रेम, आणि सहकार्य भरतात. त्यामुळे, चांगले मित्र आपल्या जीवनात एका चार्जर चे काम करतात.
योगाभ्यास आणि नियमित व्यायाम
योगाभ्यास आणि नियमित व्यायाम दोघेही आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. योगाभ्यासाने शरीर आणि मन शांत होते, तर नियमित व्यायामाने शरीर निरोगी आणि लवचिक राहते. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा चार्जर म्हणून आपल्या जीवनात समावेश करणे आवश्यक आहे.
आरोग्य पर्यटन (Health Tourism):
आरोग्य पर्यटन म्हणजे आरोग्य सुधारण्यासाठी प्रवास करणे.
यामध्ये योगा, ध्यान, नैसर्गिक उपचार आणि आरोग्य-संबंधित क्रियाकलाप यांचा समावेश असू शकतो.
कधीकधी फक्त पर्यटन केल्याने पण मन प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचे सकारात्मक परिणाम होतात. म्हणूनच पर्यटन एक चार्जर म्हणून आपल्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
अभ्यास आणि पुस्तके
हे दोन्ही घटक आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अभ्यासामुळे आपण नवीन गोष्टी शिकतो, ज्ञान वाढवतो आणि आपल्या मेंदूला चालना देतो. पुस्तके वाचल्याने आपण वेगवेगळ्या कथा, कल्पना आणि विचारांशी जोडले जातो.
अभ्यास आपण कोणत्याही वयात आणि कोणत्याही विषयाचा करू शकतो आणि पुस्तके आपल्या सर्वोत्तम मित्र बनू शकतात. त्यामुळेच हे दोन चार्जर आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
मैदानी खेळ आणि पाणी
हे दोघेही आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पाण्या वाचून आपण जगूच शकत नाही , पाणी आपल्याला हायड्रेटेड ठेवते. पाणी पिण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
तर मैदानी खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. मैदानी खेळामुळे शारीरिक हालचाली होतात, ज्यामुळे स्नायू आणि सांधे मजबूत होतात.
म्हणूनच पाणी आणि मैदानी खेळ हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे चार्जर आहेत.
संगीत
प्रसन्न संगीत हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायद्याचे आहे. हे मानसिक आणि शारीरिक आराम देते. प्रसन्न संगीत आपल्या शरीरासाठी एका उत्तम चार्जर चे काम करू शकते.
संतुलित आहार
आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. संतुलित आहारामुळे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे हा चार्जर आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे.
आवडते छंद
छंद बाळगल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो आणि सामाजिक संबंध सुधारतात. छंद तुम्हाला आवडत्या गोष्टींमध्ये रमून जाण्यासाठी वेळ देतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो आणि सकारात्मक भावना निर्माण होतात. त्यामुळे छंदरूपी चार्जर आपल्या आरोग्यासाठी गरजेचा आहे.
Smile
आणि अत्यंत महत्त्वाचा चार्जर म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य. हसत रहा आणि निरोगी रहा .
Smile please (•‿•)