पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या महत्त्वाचे उपाय
पावसाळा म्हणजे थंड हवामान, हिरवळ आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद… पण त्याचसोबत हा ऋतू विविध आजार आणि त्वचेच्या त्रासांना देखील आमंत्रण देतो. विशेषतः फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य संसर्ग याचा धोका या ऋतूमध्ये खूप वाढतो. आर्द्रता, ओले कपडे, घाम आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी खालील साधे उपाय जरूर पाळा.
1. त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवा
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना नेहमी स्वच्छता आणि कोरडेपणाला प्राधान्य द्या. आंघोळीनंतर टॉवेलने पूर्णपणे कोरडे पुसा. काखा, मान आणि पायामधील जागा विशेषतः स्वच्छ ठेवा.
2. पावसात भिजलात तर आंघोळ आवश्यक
पावसात भिजल्यानंतर त्वरित साध्या पाण्याने आंघोळ करा. डोके स्वच्छ धुवा आणि ओले कपडे लगेच बदला. ओल्या कपड्यांमध्ये राहिल्यास पुरळ, मुरुम यासारखे त्रास होऊ शकतात.
3. बाहेरून घरी आल्यानंतर हातपाय धुवा
घरात प्रवेश करण्याआधी हातपाय स्वच्छ धुवा. पावसामुळे चिखल किंवा साचलेले पाणी शरीरावर लागत असल्यास त्वचेला संसर्ग होऊ शकतो. विशेषतः ओले पाय किंवा बूट घातल्यास पायांच्या बोटांमध्ये फंगल इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो.
4. ओले कपडे, टॉवेल वापरणे टाळा
पावसात कपडे पूर्ण कोरडे होणे कठीण असते, पण दमट कपडे घालणे टाळा. अंतर्वस्त्रे आणि टॉवेल उन्हात चांगले वाळवा. ओले कपडे फंगल वाढीस पोषक ठरतात.
5. सुटी कपडे वापरा आणि टॅल्कम पावडर वापरा
घाम येतो त्या भागावर सुती कापड वापरून त्वचा कोरडी ठेवा. टॅल्कम पावडरचा वापर केल्याने घाम नियंत्रणात राहतो आणि संसर्ग टाळता येतो.
जर फंगल इन्फेक्शनची लक्षणे दिसत असतील – उग्र खाज, लालसर पुरळ, त्वचेचा रंग बदलणे इत्यादी – तर स्वतः औषधे न घेता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य उपचाराशिवाय संसर्ग वाढू शकतो.
वरील लेखामध्ये दिलेली माहिती सामान्य आरोग्यज्ञान आणि गृहउपायांवर आधारित आहे. कृपया कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.