मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा शैक्षणिक संकुलातील सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी आणि अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन व कोनशिला अनावरणदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ नेते डॉ. अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील भीष्म पितामह असून, धडधाकट शरीरयष्टी, कणखर आवाज, शिस्त आणि दरारा हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. तळागाळातील जनतेचे प्रश्न प्रशासकीय पकड व सखोल अभ्यास याद्वारे त्यांनी सोडवले असून, महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्यासाठी आपल्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनीच पुढाकार घेतला आणि प्रत्येक गावात पिण्याचे पाणी मिळण्यासाठी नियोजन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची स्थापनाही केली.
80 च्या दशकाच्या शेवटी अण्णासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. या लढ्याला राजकीय स्वरूप देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा व्यापक केला. तळागाळात जायचे असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करूनच आपण इथे आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, त्यापैकी सुमारे 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात सुमारे ₹5029 कोटी जमा केले असल्याचे सांगून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 महिन्यात पैसे जमा होतील, तसेच कर्जाची प्रामाणिकपणे वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही खात्यात ₹50000 जमा होतील असे त्यांनी सांगितले.
मुघलांच्या काळात देशभरातील हिंदू देवतांच्या मूर्ती आणि मंदिरांची विटंबना केली गेली होती. त्या देवालयांचा व घाटांचा जीर्णोद्धार ज्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यांच्या चौंडी या जन्मस्थानाचा शोध डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी घेतला आणि त्याचा जीर्णोद्धार केला. तसेच, वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही त्यांनी सुरू केले. त्यांचे कार्य आता पुढे नेत असून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मस्थान विकासासाठी राज्य शासनाने ₹700 कोटींचा विकास आराखडा केला आहे. तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी वाढीव भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्या भव्य स्मारकाचेही काम सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
सामाजिक क्षेत्राबरोबर शैक्षणिक कार्य करताना डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आश्रमशाळा उभी केली आहे. अनेक आव्हानांच्या काळातही दीनदयाळ सूतगिरणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अण्णांना जडीबुटींचे उत्तम ज्ञान असून, ते त्यांचा वापर करून शंभरी पार करतील, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.