सहकाराची कास धरत हरित आणि शाश्वत भविष्याकडे मार्गक्रमण!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे 'आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष – 2025' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत राज्य शिखर समितीची बैठक संपन्न झाली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाचे विविध उपक्रम समन्वयाने राबविण्यात यावेत. राज्यातील सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याने सहकार क्षेत्रात केलेली प्रगती आणि दिलेले योगदान जनतेपर्यंत पोहोचावे, यासाठी हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात यावा. राज्यस्तरीय शिखर समितीमार्फत वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी समितीसमोर सादर करण्यात यावी. सध्या सहकार क्षेत्रासमोर असलेल्या बदलत्या आव्हानांचा अभ्यास करून सहकार कायद्याचे पुनर्विलोकन करणे आवश्यक आहे. सहकार कायद्यात कोणत्या तरतुदी असाव्यात, याबाबत अभ्यासगट तयार करून त्याचा अहवाल समितीसमोर सादर करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश:
???? 'आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025' साजरे करताना विविध उपक्रमांमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण यावर विशेष भर द्यावा.
???? हे सर्व उपक्रम राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या सक्रीय सहभागातून आणि मदतीने राबवावेत.
???? सहकार, कृषी, पणन, दुग्ध व्यवसाय, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, मत्स्य व्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा या विभागांनी एकत्र समन्वयाने वर्षभराचे काटेकोर नियोजन करावे.
???? 'सहकार पुरस्कार 2025' साठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 18 जुलैवरून 31 जुलैपर्यंत वाढवावी.
???? उपक्रमांची माहिती राज्यभर जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी प्रभावी प्रचारात्मक योजना राबवावी.
यापूर्वी अहमदनगरच्या शिर्डी येथे 'सहकार परिषद', नागपूर व मुंबई येथे 'सहकार दिंडी'चे आयोजन झाले असून आगामी काळात विविध जिल्ह्यांमध्ये उपक्रम राबवले जाणार आहेत.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.