भारतीय खेळाडूंनी यंदाच्या पॅरा-आशियाई स्पर्धेत सर्वाधिक पदकांची नोंद करत आपली मोहिम यशस्वी केली. भारतीय संघाने स्पर्धेत ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य अशा एकूण ११४ पदकांची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज आणखी दिवस आहे. परंतु अखेरच्या दिवशी भारताचा एकही खेळाडू मैदानात उतरणार नाही.
भारताने गेल्या आवृत्तीतील १०८ पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. हांगझो येथील स्पर्धेत भारताने २७ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४९ कांस्य पदके होती. या स्पर्धेत प्रथम भारताच्या नावावर १११ पदके होती, परंतु नीरज यादव आणि परवीन यांच्यावर उत्तेजक सेवनाचे आरोप झाल्यामुळे त्यांची तीन पदके काढून घेण्यात आली होती.
आइची-नागोया येथील ही कामगिरी अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने सरस ठरली आहे, कारण मागच्या आवृत्तीच्या (३०९) तुलनेत या वेळी पाठवण्यात आलेल्या भारतीय पथकातील खेळाडूंची संख्या (१६८) लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली होती.
नेहमीप्रमाणे यावेळीही भारताच्या एकूण पदकतालिकेत निम्म्याहून अधिक वाटा पॅरा ॲथलेटिक्सचा राहिला. भारतीय पॅरा-ॲथलेटिक्स चमूने २२ सुवर्ण, १९ रौप्य आणि २४ कांस्यपदकांसह एकूण ६५ पदके जिंकली. हे गेल्या आवृत्तीपेक्षा १२ पदकांनी जास्त आहे. पॅरा-बॅडमिंटनमध्ये भारताने १६ पदकांची कमाई केली. पण, ही संख्या मागील आवृत्तीपेक्षा पाचने कमी आहे, जिथे भारताने २१ पदके जिंकली होती. पॅरा-जलतरण आणि टेबल टेनिस या दोन खेळात भारताने हांगझोमधील कामगिरीत सुधारणा केली. हांगझो येथे जलतरणात भारताला केवळ एक पदक मिळवता आले होते, परंतु या वेळी त्यांनी तीन रौप्य आणि आठ कांस्य पदकांसह एकूण ११ पदकांचे योगदान दिले. त्याचप्रमाणे, टेबल टेनिस खेळाडूंनी गेल्या वेळी दोन कांस्य पदके जिंकली होती, परंतु यावेळी त्यांनी सात कांस्य पदके जिंकून पदकतालिकेला मोठा हातभार लावला.
संदीप, हनीचा जागतिक विक्रम
भारताच्या संदीप आणि हनी यांनी शुक्रवारी पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत जागतिक विक्रमाने भारताच्या मोहिमेची सांगता केली. संदीपने पुरुषांच्या ४०० मीटर टी-६४ आणि हनी याने पुरुषांच्या भालाफेक एफ ३७-३८ प्रकारात जागतिक विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले. ४०० मीटर अंतिम फेरीत संदीपने ५२.२८ सेकंदांची नोंद करत नवा जागतिक विक्रम केला. त्याने सौदी अरेबियाच्या नूर अलसाना (५३.१३ सेकंद, सीझन बेस्ट) याच्यापेक्षा ०.८५ सेकंद आधी शर्यत पूर्ण केली. भारताचा अजय कुमार कांस्यपदकाचा मानकरी ठरला. भालाफेक अंतिम फेरीत हनीने ६०.४९ मीटर अंतरावर भाला फेकत नवा जागतिक विक्रम नोंदवला आणि १११६ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
मोना, निशाद ध्वजवाहक
प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई करणारी नेमबाज मोना अग्रवाल आणि उडी प्रकारातील खेळाडू निशाद कुमार शनिवारी स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात भारताचे ध्वाजवाहक असतील. मोनाने महिलांच्या १० मीटर एअर रायफल आणि २० मीटर रायफल थ्री पोझिशन, तर निशादने उंच आणि लांब उडी प्रकारात सुवर्णपदके मिळविली आहे