मुंबई : राज्यातील लाखो रुग्णांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवासी डॉक्टरांच्या (MARD) संघटनेने अखेर सुरू असलेला संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील ओपीडी, आयपीडी, नियोजित शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा सेवा आणि शैक्षणिक उपक्रम पुन्हा नियमितपणे सुरू होणार आहेत.
डॉक्टरांचा संप मागे घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून उपचारांसाठी प्रतीक्षा करणाऱ्या हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. संपामुळे अनेक रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), दाखल रुग्णांची सेवा (आयपीडी) आणि नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम झाला होता. आता या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच डॉक्टरांनी संप मागे घेतल्यास त्यांच्या मागण्यांवर तातडीने सुनावणी घेण्याचे आश्वासन न्यायालयाने दिले होते. या निर्देशानंतर एमएआरडीने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, संप मागे घेतला असला तरी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्या कायम आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे एमएआरडीने स्पष्ट केले आहे.