नारळाच्या पानांमधून जागतिक क्रांती: साजी वर्गीस यांची ‘सनबर्ड स्ट्रॉ’ची प्रेरणादायी कहाणी
बंगळुरूतील ख्रिस्ट युनिव्हर्सिटीचे इंग्रजी प्राध्यापक साजी वर्गीस यांनी प्लास्टिक स्ट्रॉला एक पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण पर्याय तयार केला आहे – ‘सनबर्ड स्ट्रॉ’. नारळाच्या पानांपासून तयार केलेले हे जैविक स्ट्रॉ आज संपूर्ण जगात पर्यावरण रक्षणासाठी एक मजबूत उदाहरण ठरले आहे.
२०१७ मध्ये आपल्या कॅम्पस परिसरात पडलेली नारळाची पानं पाहून साजी वर्गीस यांच्या मनात पर्यावरणस्नेही उत्पादनाची कल्पना रुजली. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी अशी स्ट्रॉ तयार केली जी नैसर्गिक, रसायनमुक्त आणि पाण्यात निघळत नाही. एक नारळाच्या फांदीतून जवळपास २०० स्ट्रॉ तयार होतात. या स्ट्रॉजची टिकाऊ क्षमता सुमारे ३ तासांपर्यंत असते आणि त्या पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहेत.
साजी वर्गीस यांनी केवळ पर्यावरणच नाही, तर समाजाचाही विचार केला. कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये त्यांनी उत्पादन केंद्रे सुरू केली असून आज १०० हून अधिक ग्रामीण महिला या प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आहे.
आज ‘सनबर्ड स्ट्रॉ’ युके, स्पेनसारख्या २० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. कंपनीने आजवर २० मिलियनहून अधिक स्ट्रॉ विकल्या असून, सध्या त्यांचा वार्षिक टर्नओव्हर १.६ कोटी रुपयांहून अधिक आहे. प्रीमियम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांच्यासोबत बी२बी व्यवसायही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
साजी वर्गीस यांनी सिद्ध केलं आहे की शिक्षण, संशोधन आणि सामाजिक भान यांचा संगम झाला, तर परिवर्तनाची दिशा आणि गती दोन्ही बदलू शकते. नारळाच्या पानांना नवजीवन देत त्यांनी केवळ पर्यावरणाचा बचाव केला नाही, तर ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्गही दिला.
‘सनबर्ड स्ट्रॉ’ ही केवळ एक स्ट्रॉ नाही, ती आहे एक शाश्वततेची आणि सर्जनशीलतेची कहाणी – जिथे एक प्राध्यापक जागतिक उद्योजक बनतो.