नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग व कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींना निःशुल्क जयपूर फूट साहित्य व सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशभरात प्रसिद्ध झालेल्या जयपूर फूट आणि इतर दिव्यांग सहाय्यता साहित्यामुळे अनेक दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवणे शक्य झाले आहे. कृत्रिम पाय, हात तसेच अन्य कृत्रिम अवयव बसविल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनातील विविध कामे अधिक सुलभपणे करता येतात. या माध्यमातून त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास मदत होते. भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती ही 1975 पासून देशात आणि देशाबाहेर दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंध व शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना विकलांग न संबोधता दिव्यांग अशी सन्मानजनक ओळख दिली. दिव्यांगांच्या अडचणी शक्य तितक्या कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने शिबिरे आयोजित करून दिव्यांग व्यक्तींना आवश्यकतेनुसार श्रवणयंत्र, व्हीलचेअर, अंधांसाठी काठी तसेच इतर साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींचे मानधन वाढवून ₹2500 करण्याचा निर्णय घेतला. त्यांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या क्षेत्रात सन्मानाची संधी मिळावी यासाठी सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्णबधीर मुलांमध्ये लहान वयातच आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आल्यास त्यांची ऐकण्याची व बोलण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होऊ शकते. यासाठी 'कॉक्लिअर इम्प्लांट'सारख्या शस्त्रक्रिया महत्त्वाच्या असून, या उपचारासाठी सुमारे ₹6 ते ₹8 लाख खर्च येतो. हा खर्च महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भविष्यात राज्यभरात सर्वेक्षण करून विशेषतः 10 वर्षांखालील कर्णबधिर मुले आढळल्यास त्यांच्यावर योग्य वेळी आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जातील.
दिव्यांग व्यक्तींना दरमहा सुमारे ₹20,000 पर्यंत रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे, तसेच गृहनिर्माणासह विविध योजनांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य मिळावे, यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय भेंडे, आमदार डॉ. राजीव पोतदार, आमदार कृपाल तुमाने, आमदार मोहन मते, आमदार चरणसिंग ठाकूर, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.