मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
  • Positive News
  • जुलै 21 2026

Share on  


मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता आणण्याच्या दृष्टीने वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक पूर्वनियोजन करून निश्चित करावे, तसेच कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मराठी विकास संस्थेने सर्व वैधानिक अनुपालने पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रशासकीय व वैधानिक अनुशेष दूर झाल्यामुळे संस्थेची रचना अधिक सक्षम आणि परिणामकारक झाल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस धोरणे राबविण्यावर भर देण्यात येणार असून, संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मक भूमिकेतून सोडविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध बोलींच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. 'पुस्तकांचे गाव' आणि 'पेटी वाचनालय' उपक्रमांचा विस्तार करून आदिवासी व सीमावर्ती भागातील मराठी शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविणे, झाडीबोली आणि पूर्व विदर्भातील नाट्यपरंपरेच्या जतनासाठी गडचिरोली-वडसा परिसरात नाट्यसंकुल उभारणे, भारुड, गोंधळ, पोवाडा यांसारख्या लोककलांद्वारे मराठीचा सांस्कृतिक वारसा जपणे तसेच बालसाहित्य आणि बालग्रंथालयांना प्रोत्साहन देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. या सर्व प्रस्तावांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीस मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डिस्क्लेमर :
ही बातमी मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाच्या आधारे तयार करण्यात आली असून, केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या