‘लोक-शास्त्र सावित्री’चा प्रयोग 

‘लोक-शास्त्र सावित्री’चा प्रयोग 
  • Positive News
  • सप्टेंबर 24 2026

Share on  

‘लोक-शास्त्र सावित्री’चा प्रयोग 

चाळीसगाव : प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा काही वळणांवर येते, जिथे ती यापूर्वीही कधीतरी उभी राहिलेली असते. प्रसंग बदललेले असतात, काळ पुढे गेलेला असतो, माणसं बदललेली असतात, पण आपल्या जगण्यातील काही ठरावीक पॅटर्न मात्र पुन्हा पुन्हा त्याच वळणावर घेऊन येतात. मात्र काळाच्या बदलत्या प्रवाहातून आलेले अनुभव, नव्याने झालेल्या जाणिवा आणि जीवनाकडे पाहण्याची बदललेली दृष्टी त्या क्षणी त्या जुन्या पॅटर्नला प्रश्न विचारते आणि तिथेच त्याला ब्रेक लागतो. तेच वळण मग पूर्वीसारखे राहत नाही... परिवर्तनाची पडाव होतो

चाळीसगाव येथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित 'लोक-शास्त्र सावित्री’ चा प्रयोग याच प्रक्रियेचा सजग अनुभव होता. नाटकात घडणाऱ्या प्रसंगांमध्ये उपस्थित प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य दिसत होतं. नाटकातील प्रसंग, विचार ते स्वतःच्या अनुभवांशी जोडत होते. आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांकडे, घेतलेल्या निर्णयांकडे आणि जगण्यातील वळणांकडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी या नाटकाने त्यांना दिली.

‘लोक-शास्त्र सावित्री’चा विचार माणूस म्हणून जगण्याची दृष्टी जागवतो. आणि जेव्हा जगण्याची दृष्टी बदलते, तेव्हा आयुष्याची वळणंही बदलू लागतात. म्हणूनच हे नाटक माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडले जाते.

याची सर्वाधिक परिणामकारक प्रचिती प्रेक्षकांच्या प्रतिसादातून येत होती. नाटकातील प्रत्येक संवादाने त्या स्वतःच्या आयुष्यात डोकावत होत्या, त्यावर विचार करत होत्या, मनन करत होत्या. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर त्याच क्षणी त्या मनमोकळेपणाने हसत होत्या. नाटकातील काही संवाद तर त्या आमच्यासोबत स्वतःच म्हणत होत्या.

“हे अगदी खरंय...” त्यांचा हा साधा प्रतिसाद त्यांच्या स्वतःच्या जगण्याकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होता.

संबंधित बातम्या