दुष्काळ असतानाही कुंभ ध्वजारोहणासाठी कोरड्या गोदावरीत पाणी;  नदी प्रवाही ठेवण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय!

दुष्काळ असतानाही कुंभ ध्वजारोहणासाठी कोरड्या गोदावरीत पाणी;  नदी प्रवाही ठेवण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय!
  • Positive News
  • ऑक्टोबर 16 2026

Share on  

दुष्काळ असतानाही कुंभ ध्वजारोहणासाठी कोरड्या गोदावरीत पाणी;  नदी प्रवाही ठेवण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय!


नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी गोदावरी प्रवाही ठेवण्याकरिता दुष्काळाच्या छायेत गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. कुंभच्या कामांमुळे सध्या शहरातील गोदापात्र शुष्क आहे. ध्वजारोहण सोहळ्यात गोदावरीचे सौंदर्य खुलविण्यासाठी ती प्रवाही ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थ या दोन्ही ठिकाणी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. कुंभमेळ्यानिमित्त हाती घेतलेल्या कामांसाठी शहरातील रामकुंड व अन्य कुंड कोरडे ठेवण्यात आले आहेत. गोदापात्रात पाणी नसल्याने धार्मिक विधीसाठी देशभरातून येणारे भाविक नाराज होत आहेत. कुंभपर्वाची सुरुवात महाध्वज प्राणप्रतिष्ठा आणि ध्वजारोहणाने होणार असताना त्याप्रसंगी गोदावरी प्रवाही करण्याचा विचार कुंभमेळा प्राधिकरणाने केला आहे. या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय नेते व मंत्री तसेच १३ आखाड्यांच्या प्रमुख महंतांची उपस्थिती असणार आहे.

रामकुंड आणि अन्य कुंड भरण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडावे लागेल. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघासह साधू-महंतांनी ध्वजारोहणाच्या दिवशी गोदावरी प्रवाही ठेवण्याची मागणी केली आहे. गोदापात्रात कायमस्वरूपी पाणी राहावे, यासाठी काही पर्याय यापूर्वीच पुरोहित संघाने प्रशासनाला सुचवले होते, असे माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पाणी स्थिती

नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांत दुुष्काळ जाहीर झाला आहे. लहान-मोठ्या २६ धरणांमध्ये सध्या ६७,५७७ दशलक्ष घनफूट म्हणजे ९५ टक्के जलसाठा आहे. या स्थितीत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल का, याविषयी प्रशासनाकडून अद्याप कुठलाही पत्रव्यवहार व सूचना आलेली नाही, असे नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पाच हजार रुपयांची मदत

मुंबई : दुष्काळग्रस्त भागांतील शेतकर्‍यांना दिवाळीचा दिलासा म्हणून पाच हजार रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असून एक कोटी शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे. गंभीर परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा म्हणून दिवाळीपूर्वी तातडीने पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०४ वर

राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०४ वर पोहोचली आहे. या तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्याबरोबरच कर्जवसुलीवर बंदी आणि इतर सवलतीही जाहीर केल्या आहेत. त्यात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक कामांसाठी निकषांत शिथिलता, टँकरद्वारे पाणीपुरवठा यांचा समावेश आहे.

पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून सध्या काय परिस्थिती आहे, याची माहिती घेतली जात आहे. याची स्पष्टता झाल्यानंतर या संदर्भात माहिती दिली जाईल. – शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

संबंधित बातम्या