नाशिक : शारदा सोशल ग्रुप आणि RESQ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून शिवशक्ती चौक परिसरात बिबट्या–मानव संघर्ष जनजागृती अभियान राबविण्यात आले. मानव–बिबट्या संघर्ष अभियान संस्थेचे अध्यक्ष मा. अनिकेत भाऊ मंडाले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत बिबट्याच्या हालचाली वाढल्या असून अनेक ठिकाणी मनुष्यहानी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. लहान मुले, शेतकरी, महिला अशा अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातही बिबट्याने धुमाकूळ घालत ७ ते ८ नागरिकांना गंभीर जखमी केले होते.
या पार्श्वभूमीवर “कुठून येतात इतके बिबटे?”, “कशी वाढते त्यांची संख्या?” आणि “नागरिकांनी काय काळजी घ्यावी?” या प्रश्नांची उत्तरे जनजागृतीद्वारे देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
RESQ टीमचे प्रमुख वॉर्डन श्री. वैभव भोंगाळे, सर्पमित्र दीपक महाजन यांनी तात्काळ पुढाकार घेत जनजागृती मोहीम राबवली. शिवशक्ती नगर परिसरातील नागरिकांना बिबट्याबाबत माहिती देत सतर्कता कशी बाळगावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांनी एकट्याने न जाता समूहाने जाणे, तसेच मोबाईलवर हेडफोन वापरणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला. बिबट्या मानवी वस्तीत का येतो, त्याला आकर्षित करणारे कारणे काय असतात याबाबतही समजावून सांगण्यात आले.
परिसरात उकिरड्यावर टाकला जाणारा कचरा, उष्टे अन्न यामुळे भटकी व पाळीव जनावरे आकर्षित होतात आणि त्यामुळे बिबट्यास सहज शिकार उपलब्ध होते, हे विशेष नमूद करण्यात आले. त्यामुळे कचरा उघड्यावर न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरी बिबट, मळ्यातील बिबट आणि जंगलातील बिबट—त्यांचे प्रकार, त्यांच्या सवयी यांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात आली.
उपक्रमाबद्दल शारदा सोशल ग्रुपचे अध्यक्ष अनिकेत मंडाले, RESQ टीमचे वैभव भोंगाळे आणि दीपक महाजन यांच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले.